गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी मारले जात आहेत, त्यामुळे अनेक देशांमध्ये निदर्शने होत आहेत. युद्धाबाबत इस्रायलमध्ये काही लोक निदर्शनेही करत आहेत, त्याबाबत इस्रायलच्या पोलीस प्रमुखांनी मोठं विधान केलं आहे. इस्रायलमध्ये गाझाच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्यांविरोधात झिरो टॉलरेन्स धोरण अवलंबले जाईल आणि गाझाच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्यांना बसमध्ये भरून गाझाला पाठवले जाईल, जेथे इस्रायल गेल्या काही दिवसांपासून बॉम्बफेक करत आहे, असं पोलीस प्रमुख कोबी शबताई यांनी म्हटलं आहे.
इस्रायलच्या हाइफा शहरात गाझावरील इस्रायली बॉम्बहल्ल्यांच्या विरोधात निदर्शने झाली, ती पोलिसांनी थांबवली आणि 6 आंदोलकांना अटकही केली. या अटकेनंतर शबताई यांचे विधान इस्रायली माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये ते आंदोलकांना गाझामध्ये पाठवण्याची धमकी देत होते. अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, शबताई म्हणाले की, "ज्यांना इस्रायली नागरिक म्हणून जगायचे आहे, त्यांचे स्वागत आहे. आणि ज्यांना गाझासोबत राहायचे आहे त्यांचेही स्वागत आहे. मी त्यांना गाझाला जाणाऱ्या बसेसमध्ये बसवून तिथे पाठवीन."
"कोणत्याही चिथावणीच्या घटनेबाबत इस्रायलमध्ये झिरो टॉलरेन्स धोरण अवलंबले जाईल... अशा निषेधाला कोणत्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नाही" असंही शबताई म्हणाले. तसेच इस्रायल युद्धाला सामोरे जात आहे... आम्ही अशा परिस्थितीत नाही आहोत की लोक येऊन आमची परीक्षा घेतील असंही सांगितलं. इस्रायली पोलिसांचे प्रवक्ते एली लेवी यांनी बुधवारी आर्मी रेडिओशी बोलताना सांगितलं की, 7 ऑक्टोबरपासून गाझा युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये 63 जणांना दहशतवादाचे समर्थन किंवा भडकवल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी Ynet या वृत्तसंस्थेला सांगितले की, इस्रायलमध्ये राहणारे पॅलेस्टाईन समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटवली जात आहे. गाझा पट्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या हमासला पाठिंबा दर्शवणाऱ्यांना अटक केली जात आहे. गाझा पट्टीवर ताबा ठेवणाऱ्या पॅलेस्टाईनच्या हमासच्या सैनिकांनी इस्रायलवर हल्ला करून किमान 1400 लोक मारले आणि 40,000 हून अधिक जखमी झाले. हमासच्या सैनिकांनी जवळपास 200 लोकांना ओलीसही ठेवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.