काही महिन्यांपूर्वीच सत्तेत आलेल्या नफ्ताली बेनेट यांचे पंतप्रधान पद धोक्यात आले आहे. इस्त्रायलमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून नेहमीच अस्थिर असलेल्या देशाला पुन्हा स्थिर सरकाराची गरज निर्माण झाली आहे. सत्तेत सहभागी असलेल्या इडित सिलमैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत सत्तेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्याने बेनेट सरकारने बहुमत गमावले आहे.
इस्त्रायलमध्ये लवकरच पुन्हा निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून तिथे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नसल्याने सतत निवडणुका लागत आहेत. १२० सदस्यांच्या संसदेत बेनेट सरकार अल्पमतात आले आहे. धार्मिक राष्ट्रवादी यामिना पार्टीच्या खासदार इडित सिलमैन यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये लोकांना खमीरी रोटी आणि अन्य खाद्य पदार्थ आणण्यास परवानगीला विरोध केला आहे. इस्त्रायलच्या धार्मिक परंपरेनुसार हे खाद्यपदार्थ प्रतिबंधित आहेत. धर्मनिष्ठ यहूदिंसाठी हॉस्पिटलमध्ये हे खाद्यपदार्थ नेणे धार्मिक परंपरेनुसार चुकीचे आहे. या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.
इस्त्रायलच्या सत्तेत आठ पक्षांनी आघाडी केली आहे. यामुळे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले होते. या आघाडीमध्ये इस्लामवादी ते रुढीवादी राष्ट्रवादी आणि उदारवादी पक्ष आहेत. नेतन्याहू यांचा विरोध करण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र आले होते. आता नफ्ताली यांच्या बाजुने ६० सदस्य असतील तसेच संसदेचे अधिवेशन देखील सुरु नाहीय. यामुळे विरोधकांकडे अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी तेवढे संख्याबळ आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर नफ्ताली सरकार पडले तर इस्त्रायलमध्ये तीन वर्षांत निवडणुका घेण्याची ही पाचवी वेळ असेल.
खासदार सिल्मन यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले की, इस्रायलचे ज्यू चारित्र्य आणि देशातील लोकांचे नुकसान करण्यासाठी मी सरकारला सहकार्य करू शकत नाही. देशात उजव्या विचारसरणीचे सरकार स्थापन करण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सिल्मनचे अभिनंदन केले आणि राष्ट्रवादी कॅम्पमध्ये परतण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. विशेष म्हणजे भारत भेटीवरून देखील बेनेट सरकारमध्ये मतभेद होते.