जेरुसलेम : प्राणवायूशिवाय कोणी जगेल का? हा भलता प्रश्न, असे वाटणे साहजिक आहे. कारण प्राणवायूशिवाय जीवसृष्टी अस्तित्वातच राहणार नाही; हे अगदी खरे असले तरी शास्त्रज्ञांनी वायूशिवाय जगणारा प्राणी शोधला आहे. हेनेगिया सॅमिनिकला हा तो प्राणी. त्याला जगण्यासाठी प्राणवायूची गरज नाही. या नवीन शोधामुळे प्राणीजगताबाबत गृहीत बदलण्याची शक्यता आहे.पीएनएएस या नियतकालिकात प्रकाशित माहितीनुसार अवघ्या दहापेशींचा हा इवलासा परजीवी प्राणी हेनेगिया सॅमिनिकला सॅलमन माशाच्या स्नायूत राहतो. हा प्राणी जेलीफिश आणि कोरलचा (पोवळे) नातेवाईक आहे. श्वसन न करणारा आणि प्राणवायू न घेणारा हा प्राणी आहे. जगण्यासाठी आवश्यक ऊर्जा निर्माण करणारा हा अवायुजीवी आहे. प्राणी आॅक्सिश्वसन करते, अशी धारणा होती; परंतु आता हा प्राणी या प्रकारतील नाही, असे तेल अवीव विद्यापीठातील प्रोफेसर डोरोथी हचॉन यांनी ठामपणे सांगितले.आमच्या या शोधाने उत्क्रांती अद््भुत दिशेने जाऊ शकते. आॅक्सिश्वसन हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे; परंतु या प्राण्याची ती वहिवाट नाही. आॅक्सिश्वसन वातावरणातील बुरशी, अमीबा आणि सिलिएट लिनिअजसारख्या जिवांनी श्वास घेण्याची क्षमता गमावली आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. परजीवी आॅक्सिजीवी हा योगायोगाने लागलेला शोध आहे. हा प्राणी उत्क्रांती प्रक्रियेच्या अगदी विरुद्ध असून, प्राणवायूमुक्त वातावरणात राहूनही जीवनावश्यक ऊर्जेसाठी अनावश्यक जनुके त्यागलेला हा जीव आहे.
नवीन शोध : प्राणवायूशिवाय जगणारा प्राणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 2:26 AM