इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. आतापर्यंत 8000 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलमध्ये 1400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तो शेअर करताना दावा केला जात आहे की, इस्रायली टँकने गाझामधील नागरिकांच्या कारवर हल्ला केला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
घटनेची तारीख, वेळ आणि ठिकाण याची पुष्टी करता येत नाही. पॅलेस्टिनी पत्रकार युसेफ अल सैफी यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. जो आता अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. सुमारे 37 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एका टँकने कारवर हल्ला केल्याचं दिसत आहे. ही कार परिसरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कार सुरुवातीला सरळ जाते. मग ती वळते. त्यानंतर तिच्यावर टँकने हल्ला केला जातो. त्यामुळे मोठा स्फोट होतो. काही अंतरावर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारमध्ये बसून सैफीने हा व्हिडीओ बनवला. सौदी रिसर्च अँड मीडिया ग्रुपचे (एसआरएमजी) वरिष्ठ राजकीय संपादक अहमद माहेर म्हणाले की, या घटनेनंतर सैफी गाझाच्या स्थानिक भाषेत 'ते संपूर्ण कुटुंबावर गोळीबार करत आहेत' असं म्हणताना ऐकलं.
घटनास्थळावरून बाहेर पडताना सैफी इतर कार चालकांनाही इशारा देतात. हे युद्ध सात ऑक्टोबरला सुरू झाले होते. हमासने सकाळी सहाच्या सुमारास इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. 20 मिनिटांत 5000 रॉकेट डागल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी देशाच्या दक्षिण भागात घुसून लोकांना मारलं. दहशतवाद्यांनी त्यांच्यासोबत 200 हून अधिक लोकांना ओलीसही ठेवलं होतं.