Israel Palestine Conflict: पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासविरुद्ध इस्रायलचे युद्ध सुरूच आहे. याचपार्श्वभूमीवर इस्रायलमधील लोकांनी निदर्शने केली आणि त्यांच्या सरकारला हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांना परत आणण्याची मागणी केली. ओलिसांच्या सुटकेसाठी झालेल्या निदर्शनादरम्यान लोकांनी सांगितले की, आम्ही कोणाशीही संपर्क साधू शकत नाही, आमचे आयुष्य नरकमय झाले आहे.
इस्रायलमधील लोक निदर्शन करत म्हणाली की, आमचा संपूर्ण संपर्क तुटला आहे, जगण्याची कोणतीही चिन्हे किंवा संकेत नाहीत. आता दोन आठवडे झाले आहेत आणि आम्ही येथे आहोत, आमच्या २००हून अधिक लोकांना ओलीस ठेवले आहे आणि आम्ही आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी येथे निदर्शने करत आहोत. जगाने आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने आम्हाला मदत करावी, जेणेकरून आम्ही आमच्या ओलीसांची सुटका करू शकू. त्यांना परत आणण्याची आमची मागणी आहे, आंदोलक करणाऱ्या नागरिकांनी केली.
७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबांसह शेकडो निदर्शकांनी शनिवारी रात्री राजधानी तेल अवीवमध्ये निदर्शने केली. हमासने ओलीस ठेवलेल्या त्यांच्या नातेवाइकांना परत आणण्यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली. तर हमासने ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान सुमारे २०० लोकांना ओलीस ठेवल्याचे म्हटले आहे. १९७३च्या अरब-इस्रायल युद्धानंतर हा हमासचा सर्वात मोठा हल्ला होता, ज्यात शेकडो इस्रायली नागरिक मारले गेले.
२३ लाख पॅलेस्टिनींची घरे उद्ध्वस्त-
इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला ७ ऑक्टोबर रोजी गाझा बॉम्बफेक करून प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये २.३ दशलक्ष पॅलेस्टिनींची घरे उद्ध्वस्त झाली. अत्यावश्यक पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि संपूर्ण गाझा ढिगाऱ्याखाली गेल्याचे दिसते. पॅलेस्टाईनमधील वाढत्या मानवतावादी संकटादरम्यान, आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे की इस्त्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ४१०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यातही हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
लेबनॉनवरही हवाई हल्ला-
हमासच्या दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्यानंतर इस्त्रायली लष्कराने लेबनॉनमधील काही दहशतवादी लक्ष्यांवर हवाई हल्लेही केले आहेत. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) दावा केला आहे की त्यांनी लेबनॉनमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे जे इस्रायली शहरावर क्षेपणास्त्र हल्ल्याची योजना आखत आहेत. IDFच्या म्हणण्यानुसार, त्याने दक्षिण लेबनॉनमधील दहशतवादी तळावर हल्ला केला जो इस्रायलवर अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र हल्ला करण्याची योजना आखत होता. आयडीएफने इस्रायली लष्कराच्या हल्ल्याचा व्हिडिओही जारी केला आहे.