इस्रायलने लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा आग ओकली आहे. राजधानी बेरूतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 59 जण जखमी झाले असून आठ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या हल्ल्यात हिजबुल्लाचा टॉप कमांडर इब्राहिम अकीलही मारला गेल्याचे समजते. तो हिजबुल्लाहच्या रदवान युनिटचा प्रमुख होता. तत्पूर्वी, हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले केले होते. यानंतर इस्रायलने हे हल्ले केले आहेत.
इस्रायलने गजबजलेल्या भागाला केलं लक्ष्य -बेरूतमधील दक्षिण उपनगरातील गजबजलेल्या भागाला इस्रायलने का लक्ष्य केले? त्यांचा उद्देश काय होता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, येथील लोक कामावरून निघत असताना आणि विद्यार्थी शाळेतून घरी जात असताना गर्दीच्या वेळी हे हल्ले झाले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने पीडितांसंदर्भात सविस्तर माहिती दिलेली नाही. लेबनीज न्यूज चॅनेलने कोसळलेल्या इमारतीतून जखमींना बाहेर काढतानाचे फुटेज प्रसारित केले आहे. तसेच रुग्णवाहिकाही हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. तत्पूर्वी, हिजबुल्लाने शुक्रवारी उत्तर इस्रायलवर 140 हून अधिक रॉकेट डागले होते. याच्या प्रत्युत्तरात इस्रायली सैन्याने बेरूतमध्ये 'लक्ष्यित हल्ले' केले.
...तेव्हा अकिल तेथेच उपस्थित होता -हिजबुल्लाह गटाच्या एका जवळच्या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर असोसिएटेड प्रेससोबत बोलतान पुष्टी केली आहे की, शुक्रवारी इमारतीला लक्ष्य केले गेले, तेव्हा अकिल तेथेच उपस्थित होता. अकीलने हिजबुल्लाहची वरिष्ठ रदवान फोर्स आणि समूहाची सर्वोच्च लष्करी संस्था असलेल्या जिहाद कौन्सिलचा प्रमुख म्हणूनही काम केले आहे,
अमेरिकन परराष्ट्र विभागानेही अकिलवर निर्बंध लादले होते -अमेरिकन परराष्ट्र विभागाने बेरूतमधील अमेरिकन दूतावासावर 1983 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील कथित भूमिकेसंदर्भात अकिलवर निर्बंध लादले होते. तसेच, त्याने लेबनॉनमध्ये अमेरिकन आणि जर्मन लोकांना बंधक बनवण्याचे निर्देश दिले होते आणि 1980 च्या दशकात त्यांना तेथे ओलीस ठेवले, असा आरोपही त्यावर होता.