अभय शरद देवरे
काय म्हणता ? तुमचे प्लम्बिंगचे दुकान आहे ? बरं झालं, बरं झालं, मला ब-याच दिवसापासून एक प्लंबर पाहिजेच होता ! या काम दाखवतो तुम्हाला. जॉली रुबेलनी घरी गेल्या गेल्या मला त्रिफळाचीत केलं. मला क्षणभर काहीच कळेना ते काय म्हणत आहेत ते ! मी नेमका इथे इस्राएलला कशाला आलोय ? एकपात्री कलावंत म्हणून की प्लंबर म्हणून ? स्टेजवर ब्लँक होण्याचा अनुभव त्या घरात घेत होतो. " अहो, .... नाही म्हणजे .... मी......" मी आपला शब्दांची जुळवाजुळव करू लागलो. "घाबरलात ना ? घाबरलात ना ? काळजी करू नका. मी गम्मत केली तुमची !" दिलखुलास हसत जॉली रुबेल पुढे म्हणाले, "मिस्टर देवरे यू आर अ स्टॅण्डअप कोमेडियन बट आय अँम अ बॉर्न कोमेडियन !" या एकाच वाक्याने माझ्या हृदयात या माणसाने घर केले. इस्राईलमध्ये माझ्या मुक्कामाची सोय रुबेल यांच्याकडे केली होती. किरकोळ अंगकाठी, बुल्गारिन पद्धतीची दाढी, चेह-यावर असे मिश्किल भाव की कधीही तुमची फिरकी घेतील. मोठ्या आनंदाने आयुष्य उपभोगणारा हा माणूस मूळचा पाकिस्तानी आहे हे सांगूनही पटणार नाही. १९३७ साली कराची येथे जन्मलेले जॉली रुबेल एका महाराष्ट्रीय ज्यू स्त्रीशी विवाहबद्ध झाले म्हणून मराठीशी त्यांचा संबंध आला. "छान आहे तुमची भाषा, आवडली मला. बायकोकडून मराठी शिकलो, पण आधी काय शिकलो असेन ते सांगा बरं ? " काय ?" मी प्रश्नार्थक मुद्रेने विचारलं. "अहो, शिव्या शिकलो. कारण जेंव्हा भांडण होते ना आमचे तेंव्हा कळायला पाहिजे ती मला कोणत्या शिव्या देते ते !" तिरप्या नजरेने वाहिनींकडे बघत ते म्हणाले. माझी प्रश्नार्थक मुद्रा तशीच ! "पण या बाबतीत यांनी माझ्यावरपण कडी केली बरका ! " वहिनींनी त्याच खिलाडूपणाने उत्तर दिले. हे दाम्पत्य पाहताक्षणीच आवडले मला. आज वयाच्या सत्तराव्या वर्षी रुबेल वहिनी नोकरी करतात. या वयात पहाटे पाचला उठून स्वयंपाक करून सात वाजता घराबाहेर पडतात. त्यांची एक मैत्रीण जवळच राहते आणि ती त्यांच्या ऑफिसमध्येच काम करते. ती यांच्या घरी येते आणि दोघी एकत्र ऑफिसला जातात. त्यामुळे पेट्रोल वाचते आणि हातून देशसेवा घडते. प्रत्येक क्षणी देशाचा विचार करतात ही माणसे ! जॉलीजी गुढगेदुखीमुळे बाहेरचे काम करु शकत नाहीत पण स्वयंपाक सोडून संपूर्ण घरकामाची जबाबदारी ते उचलतात.
इस्राईलमध्ये गरीब माणसेच नाहीत त्यामुळे झाडलोट, धुणीभांडी, बागकाम ही कामे स्वतःची स्वतःलाच करावी लागतात. घराचे सुतारकाम, रंगकामसुद्धा लोक स्वतःच करतात. लग्न झाल्यावर मुले आपापला वेगळा संसार थाटतात त्यामुळे वयोवृद्धांना एकटेच रहावे लागते. ती इथली सामाजिक पद्धतच आहे त्यामुळे स्वावलंबन हे इथल्या माणसांनी गृहीत धरलेले असते. युद्धजन्य परिस्थितीमुळे एकमेकातली भावनिक गुंतवणूक जराशी कमी वाटली मला, पण मराठी भाषा आणि महाराष्ट्रावरची भावनिक गुंतवणूक मात्र आपल्यापेक्षा सरस होती.
केवळ त्याच...... केवळ त्याच गुंतवणुकीतून मला तिथे एकपात्री प्रयोग करायला मिळाला. जो भारतीय ज्यू समाज इस्राएल च्या निर्मितीनंतर तिथे जाऊन स्थायिक झाला त्यातील अग्रणी असलेले श्री नोहा मस्सील यांनी इस्राईलमध्ये मराठी भाषा आणि मराठी भाषिक जतन करण्याचे खूप प्रयत्न केले. ते स्वतः मराठी लेखक आणि कवी आहेत. १९७० मध्ये ते भारत सोडून इस्राएलमध्ये स्थायिक झाले. तिथे गेल्यावर भारतातून आलेल्या बेने इस्राएल समाजाला एकत्र करण्याचे आणि मराठी भाषा संवर्धनाचे कार्य करत आहेत. १९८५ मध्ये त्यांनी मायबोली हे पहिले त्रैमासिक काढले ते आजही सुरू आहे. यात इस्राएल मधील मराठी बांधवांचे साहित्य प्रकाशित होते. मायबोलीच्या वतीने दरवर्षी मराठी संमेलन भरवले जाते. त्याचा समारोप करण्यासाठी महाराष्ट्रातुन एक कलाकार निमंत्रित केला जातो. गेल्या अठ्ठावीस वर्षात यशवंत देव, दिलीप प्रभावळकर, सुधीर जोशी विवेक म्हेत्रे असे अनेक बिनीचे कलाकार तिथे गेले होते. यावर्षी नोहाजीनी माझी निवड केली. अर्थातच मी तेवढा मोठा सेलिब्रेटी नाही तरीही नोहाजींचे केवळ मराठी भाषेवरील प्रेम हाच दुवा ठरला. "भारतीय बेने इस्राएल समाज , इतिहास, परंपरा आणि प्रवास" या नावाचे पुस्तक त्यांनी इंग्रजी भाषेत लिहिले होते. त्यांना त्या पुस्तकाचे मराठी भाषांतर करून हवे होते. २०१५ मध्ये जागतिक मराठी परिषदेच्या निमित्ताने ते सातारला आले होते. त्या भेटीत सुप्रसिद्ध लेखक आणि चित्रपट निर्माते श्री अरुण गोडबोले यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी नोहाजींच्या पुस्तकाचे मोफत मराठी भाषांतर तर करून दिलेच, शिवाय त्यांच्या कौशिक प्रकाशन या संस्थेतर्फे छापूनही दिले. दोन महिन्यांपूर्वी ते भारतात आले असताना सहज गोडबोले याना फोन केला आणि विचारले की यंदाच्या मायबोली च्या कार्यक्रमासाठी कोणी एकपात्री कलाकार आहे का ? अरुणजीनी माझे नाव सुचवले. आणि कोणत्याही परीक्षेशिवाय मी इस्राएल ला जायला उत्तीर्ण झालो. एकपात्रीच्या क्षेत्रातला मी अत्यंत छोटा कलाकार. पश्चिम महाराष्ट्राबाहेर फारसा पारिचित नसलेला, चित्रपट, मालिका यांतून कधी माझा चेहरा आलेला नव्हता. पण केवळ अरूणजी गोडबोले यांच्या शब्दावर विश्वास ठेवून नोहा मस्सील यांनी माझा कार्यक्रम न बघताही मला तिथे सादरीकरणाची संधी दिली. एका पुस्तकाच्या मराठी भाषांतरावरून सुरू झालेले ऋणानुबंध माझ्यासाठी असे उपयोगी पडले.
यानिमित्ताने नोहा मस्सील यांच्याशी आयुष्यभराची जवळीक निर्माण झाली. मराठी माध्यमात शिकलेले नोहाजी लेखक, कवी, गायक आणि कुशल संघटक आहेत. काव्यनाद आणि माझी मायमराठी हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. अत्यंत मृदुभाषी असणा-या नोहाजींकडे पाहिल्यावर एखाद्या ऋषीची आठवण येते. ऋषीच ते हो ! १९७० पासून ते आजपर्यंत ते स्वतःसाठी जगलेच नाहीत. तर आपली मराठी मायबोली आणि समाज यांच्यासाठीच त्यांनी आयुष्य देऊन टाकले.
तेल अलिव्हच्या बेन गुरियोन विमानतळावर पहाटे चार वाजता माझ्या स्वागतासाठी आलेले सायमन पेणकर यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी झालेली भेट मी कशी विसरू शकेन ? त्या दिवशी इस्राएल चा स्वातंत्र्यदिन होता. त्यामुळे सर्वत्र सुट्टी होती. आदल्या रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. त्यामुळे संपूर्ण इस्राएल रात्रभर जागे होते. सायमनजी मला पिकअप करण्यासाठी पहाटे साडेतीन वाजता विमानतळावर आले होते. म्हणजे ते झोपलेच नव्हते. मला घरी घेऊन आल्यावर त्यांनी स्वतःच्या हाताने चहा बनवून दिला. कुठली माणसे ही ? ओळखीची ना पाळखीची, रक्ताची ना नात्याची, जातीची ना धर्माची.....पण जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्यासारखे ते लोक माझ्याशी वागत होते. सायमन पेणकर याना आठ बहिणी आहेत. त्या दिवशी वार्षिक सुट्टी असल्याने ते सर्व सहकुटुंब एकत्र येऊन धमाल करतात. सायमन जी मला त्या गेटटुगेदरला घेऊन गेले. जवळजवळ तीस चाळीस जण तिथे होते. यानिमित्ताने त्यांचे रितीरीवाज, त्यांची कुटुंब पद्धती यांचा नकळत परिचय झाला. मला पाहिल्यावर सायमनजींच्या आठही बहिणींना माहेरचा भाऊ भेटल्याचा आनंद झाला. कारण प्रत्येकीची पाळेमुळे मराठी मातीत होती. महाराष्ट्रातल्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. प्रत्येकीला माझ्याशी किती बोलू आणि किती नको असे वाटत होते. आणि सायमनवहिनी तर मराठी व्यवस्थित बोलू शकत नव्हत्या पण त्यासुद्धा प्रयत्नपूर्वक मराठी मध्येच संवाद साधत होत्या. या लोकांनी मराठी भाषेला आपल्या हृदयात हिब्रू भाषेइतकेच महत्वाचे स्थान दिले आहे. तिथे जन्मलेली नवीन पिढीमात्र मराठीपासून तुटल्यासारखी वाटते. साहजिक आहे, ते जर तिथेच जन्मले असतील तर त्यांना मराठीविषयी प्रेम कसे असणार ?
सायमन कुटुंबियांच्या संमेलनात माझी भेट झाली रेफाएल रोहेकर यांच्याशी. आय डी बी आय बँकेत मोठ्या पदावरून ते सेवानिवृत्त झाले आणि इथे स्थायिक झाले. युनायटेड वेस्टर्न बँक आय डी बी आय मध्ये विलीन झाल्यावर प्रत्येक ब्रँच चे नूतनीकरण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यानिमित्ताने ते अनेकदा सातारला आले होते. आज महाराष्ट्रात जिथे जिथे आय डी बी आय च्या नवीन पद्धतीच्या शाखा दिसतात त्या सर्व त्यांनी बनवून घेतल्या आहेत. मी भेटल्यावर ते महाराष्ट्रातील आठवणींनी भावुक झाले. त्यांच्या तोंडून ते प्रसंग अस्खलित मराठीत ऐकताना मी इस्राएल मध्ये नाही तर पुण्यात आहे असे वाटत होते.
"चंद्रलेखा" चालू आहे का हो अजून ? आयझेक अवास्कर यांच्या प्रश्नाने मी चमकलो. माझ्या एकपात्री प्रयोगाच्या आधी ते मला भेटले. " होय, प्रशांत दामले ती नाट्यसंस्था चालवतात. पण तुम्हाला कसे माहिती ? " मी आश्चर्याने विचारले. " अहो, माझे आयुष्य चंद्रलेखात गेले. मी मोहन वाघ यांच्याबरोबर तीस वर्षे तिथे काम केले. मोहन वाघ म्हणजे......राजा माणूस..... मराठी माणसाला त्यांनी सिनेमा सोडून नाटक बघायला लावले. ते गेले आणि माझ्या आयुष्यातील मराठी नाटकच संपलं. मी भारत सोडून सरळ इकडेच आलो. " आवस्कर जुन्या आठवणीत रमले होते. मला त्यांना त्यातून बाहेर काढावेसे वाटले नाही. हळूच तेथून सटकलो.
रामले येथील कार्यक्रमाचे प्रायोजकत्व तेथील नमस्ते या हॉटेलने स्वीकारले होते. त्या हॉटेलचे मालक जोएल सोगावकर काही कारणाने कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. पण संध्याकाळच्या जेवणाला त्यांनी मला खास हॉटेलवर बोलावले. त्यांचेही शिक्षण मराठीत माध्यमात झाल्याने त्यांच्या रक्तात मराठी होते. इस्राएल मध्ये राहूनही महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती त्यांना होती. साहित्य, संगीत, समाजकारण, राजकारण, अशा सर्व बाबतीत त्यांना रस आणि अभ्यास होता. मायबोलीच्या वतीने मराठीचा कोणताही कार्यक्रम असो, ते स्वतःहून प्रायोजकत्व स्वीकारतात. दरवर्षी होणा-या स्नेहसंमेलनात ते दरवर्षी महाराष्ट्रीय पद्धतीचे शाकाहारी जेवण बनवून सर्वाना खिलवतात. मराठीबद्दल फक्त प्रेम असणे वेगळे आणि मराठीसाठी स्वतःची पदरमोड करणे वेगळे !
मराठी ही काही या सर्वांची स्वतःची भाषा नाही, परिस्थितीमुळे त्यांना महाराष्ट्रात राहावे लागले आणि ही भाषा शिकावी लागली. पण हे लोक असेकाही मराठीच्या प्रेमात पडले की त्यांचा श्वास मराठी झाला. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर काही जणांचे एवढे प्रेम आहे की इस्राएल देशाने बोलावले तरी महाराष्ट्र सोडून त्यांना जावेसे वाटले नाही. कोकण किना-यावर आणि मुंबईत आजही सुमारे तेविसशे ज्यू राहतात. ते इथल्या मातीशी येवढे एकरूप झालेत की तिला सोडून ते जाऊच शकत नाहीत. पेरेस पेझरकर हे त्यातीलच एक. ठाणे येथे ते प्रवासी एजन्सी चालवतात. माझा व्हिसा आणि तिकीट काढून देण्याचे काम त्यांनीच केले. एरवी मुलाखत घेतल्याशिवाय इस्राएलचा व्हिसा मिळत नाही. पण पेझरकर यांनी आपले वजन वापरून मुलाखतीशिवाय माझा व्हिसा करून आणला. व्हिसा झालेला पासपोर्ट माझ्या ताब्यात देण्यासाठी ते मला ठाणे येथे बोलावू शकले असते किंवा कुरियरने पाठवू शकले असते. पण मी दादरला आलो आहे समजल्यावर हा माणूस ठाण्याहून दादरला खास मला भेटायला आला आणि पासपोर्ट सुपूर्द केला. ग्राहकाला घरी जाऊन सेवा देणे ही मार्केटिंगची आधुनिक पद्धत तर झालीच पण त्याहीपेक्षा एका मराठी माणसाने त्याच्या पितृभूमीला भेट देण्यासाठी निघालेल्या दुस-या मराठी माणसाला दिलेले ते सहकार्य होते.
प्रत्येकाच्या छातीत दोन फुफुसे असतात. दोघेही प्राणवायू मिळवून त्यावर शरीर जगवत असतात. या लोकांनासुद्धा दोन फुफुसे आहेत, एकाचे नाव मराठी आहे तर दुस-याचे हिब्रू ! या दोघांसाठी ते प्राणवायू मिळवतात आणि दोन्ही बाजूच्या संस्कृती जिवंत ठेवतात ! "माझ्या मराठीची बोलू कवतीके, अमृततेही पैजा जिंके" असे ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले वर्णन हे लोक जागतात !