जेरुसलेम/ नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावाच्या परिस्थितीत इराण आणि इस्रायल कोणतीही माघार घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे चित्र आहे. इस्रायल योग्यवेळी प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यावर पक्षपात केल्याचा आरोप करीत त्यांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. भारताने बुधवारी सर्व बाजूंनी संयम बाळगावा, संघर्ष आणखी पसरू नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.
इस्रायलने हिज्बुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह व अतिरेकी संघटनेच्या इतर कमांडरना मारल्याच्या प्रत्युत्तरात इराणने इस्रायलवर सुमारे २०० क्षेपणास्त्रे डागल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबद्दल भारत अत्यंत चिंतेत आहे, असे स्पष्ट करीत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केले आहे. या भागातील सुरक्षा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असेही स्पष्ट करण्यात आले. इराणमधील भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचा, तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
गुटेरेस यांना इस्रायलमध्ये येऊ देणार नाहीसंयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यावर देशाविरुद्ध पक्षपात केल्याचा आरोप करीत इस्रायलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कॅट्झ यांनी बुधवारी केली. या निर्णयामुळे इस्रायल आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील आधीच सुरू असलेला वाद आणखी वाढणार आहे.
प. आशियातील संघर्षाचा फटका विमानांनापश्चिम आशियातील देशांतील संघर्षाचा फटका भारतात येणाऱ्या विमान प्रवाशांना बसू लागला आहे. यामुळे विशेषतः मुंबई व हैदराबाद येथे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना फटका बसत आहे. या संघर्षामुळे इराण आणि जॉर्डन येथील आकाशातून अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे स्थगित केली आहेत.
दक्षिण गाझावर इस्रायली हल्ल्यात ५१ जण ठारदक्षिण गाझामध्ये खान युनिस शहरात इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यात बुधवारी रात्री कमीत कमी ५१ जण ठार, तर ८२ जखमी झाले. त्यात स्त्रिया आणि मुलांचा समावेश आहे, असे पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.
नेतन्याहू म्हणजे २१ व्या शतकातील हिटलर : इलाहीइराणची राष्ट्रीय संपत्ती आणि प्रदेशातील हितसंबंधांवर हल्ला करण्यापासून दूर न राहिल्यास इराण इस्रायलवर पुन्हा हल्ला करील, असा इशारा इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी दिला. इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ला ही प्रत्युत्तराची कारवाई होती, असे सांगत त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान या शतकातील नवीन हिटलर आहेत, अशी टीका केली. ‘जर या काळातील हिटलरने क्रूरता व शत्रुत्व थांबवले, तर त्याच्या देशाला परिणामांना सामोरे जावे लागणार नाही’, असेही ते म्हणाले.
१४ इस्रायली सैनिकांचा लेबनॉनमध्ये मृत्यू?इस्रायली सैन्याने या आठवड्यात लेबनॉनमध्ये केलेल्या कारवाईत आपला पहिला सैनिक मृत्युमुखी पडल्याची घोषणा केली; परंतु या संघर्षात इस्रायलचे १४ सैनिक ठार झाल्याचे वृत्त स्काई न्यूज अरेबियाने दिले आहे. दरम्यान, सायप्रसमध्ये इस्रायली राजदूतासह तीन जणांचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त आहे.