ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १३ - प्रसिध्द फॉर्च्यून नियतकालिकाने अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांचे विष्णूरूपातील चित्र मुखपृष्ठावर प्रसिध्द करुन नवा वाद निर्माण केला आहे. फॉर्च्यूनच्या या कृत्याने अनेकांच्या भावना दुखावल्या असून, अमेरिकेतील भारतीयांनी याबद्दल संताप व्यक्त केलाआहे.
फॉर्च्यूनने अॅमेझॉनच्या भारतातील विस्तारासंबंधी वृत्त प्रसिध्द केले होते. त्यासाठी त्यांनी जानेवारीच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीमध्ये बेझोस यांचा विष्णूरुपातील फोटो प्रसिध्द केला. फॉर्च्यूनच्या या चित्रामध्ये बेझोस यांच्या एका हातात कमळ आणि दुस-या हाताच्या तळव्यावर अॅमेझॉनचा लोगो दाखवला आहे. फॉर्च्यूनच्या जानेवारीच्या आवृत्तीतील हा फोटो आहे. व्यावसायिक अनिल दाश यांनी या वादग्रस्त मुखपृष्ठाकडे लक्ष वेधले.
भारतात आणि अमेरिकेत रहाणारे भारतीयही भगवान विष्णूंची पूजा करतात. सोशल मीडियावरुनही अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेत भारतीय देवतांचा अपमान होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अमेरिकेत भारतीय देवतांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला आहे.