पेशावर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व पाकिस्तान मुस्लीम लीगचे सर्वोच्च नेते नवाझ शरीफ यांना इंग्लंडमधून परत आणण्यासाठी सरकार सर्व शक्यता पडताळून बघत आहे. परंतु, इंग्लंडशी प्रत्यार्पणाचा करार नसल्यामुळे शरीफ यांचा पासपोर्टच रद्द केला जाऊ शकतो, असे अंतर्गत मंत्री शेख राशीद अहमद यांनी शुक्रवारी म्हटले. शरीफ यांचा पासपोर्ट सरकार १६ फेब्रुवारी रोजी रद्द करील व त्याचे नूतनीकरण केले जाणार नाही, असे अहमद यांनी बुधवारी म्हटले होते.
नवाझ शरीफ यांना चार आठवडे उपचारांसाठी विदेशात जाण्यास लाहोर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नोव्हेंबर २०२० पासून शरीफ हे लंडनमध्ये राहात आहेत. तीन वेळा पंतप्रधान राहिलेले शरीफ हे ॲव्हेनफिल्ड प्रॉपर्टीज आणि अल-अझिझिया या भ्रष्टाचार दोन प्रकरणांत दोषी ठरलेले असून, अनेकवेळा इशारे देऊनही ते न्यायालयात हजर राहिले नाहीत म्हणून गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने गुन्हेगार जाहीर केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी शरीफ यांच्या प्रत्यार्पणासाठी गरज भासल्यास ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांच्याशीही मी संपर्क साधेन, असे गेल्या ऑक्टोबरमध्ये म्हटले होते.