न्यूयॉर्क : कर्नाटक निवडणुकीतील विजयानंतर आता इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमचा पक्ष भाजपला पराभूत करेल. तसेच, केवळ काँग्रेस पक्षच नाही तर भारतातील जनता त्याच्या द्वेषाने भरलेल्या विचारसरणीचा पराभव करणार आहे, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.
वॉशिंग्टन आणि सॅन फ्रान्सिस्कोला भेट दिल्यानंतर राहुल गांधी न्यूयॉर्कला पोहोचले. इंडियन ओव्हरसीज काँग्रेस-यूएसएने येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, आम्ही कर्नाटकात दाखवून दिले आहे की आम्ही भाजपला पराभूत करू शकतो. आगामी निवडणुकीनंतर आता तेलंगणात भाजपला शोधणे कठीण होईल. विरोधक एक झाले आहेत, आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत. ही वैचारिक लढाई आहे. एका बाजूला भाजपची फुटीरतावादी विचारसरणी, भाजपची द्वेषाने भरलेली विचारसरणी आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाची स्नेहपूर्ण, प्रेमळ विचारधारा आहे. (वृत्तसंस्था)
पंतप्रधानांच्या सर्वत्र आदराचा अभिमान
‘पंतप्रधान मोदी सर्वत्र आदरास पात्र आहेत आणि हे पाहून मला अभिमान वाटतो,’ अशी प्रतिक्रिया ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी व्यक्त केली आहे. त्यांना हा सन्मान मिळत आहे कारण ते भारतीय पंतप्रधान आहेत.