लास वेगास : अमेरिकेतील लास वेगासमध्ये असलेल्या मँडले बे कसिनोमध्ये सोमवारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 58 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
लास वेगासमधील मँडले बे कसिनोच्या वरच्या मजल्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. या कसिनोच्याजवळच एक म्युझिक फेस्टिव्हल सुरू होता त्यामुळे येथे लोकांची मोठी गर्दी होती. येथील स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता हा गोळीबार करण्यात आला. या कॅसिनोमध्ये कंट्री म्युझिक फेस्टिव्हल सुरु होता. त्याचवेळी हल्लेखोर घुसले आणि मशीनगनमधून त्यानी गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गायक जेसोन एल्डिनचा परफॉर्मन्स सुरु असताना हा गोळीबार झाला. याठिकाणी अचानक गोळीबाराला सुरूवात झाल्याने गोंधळ उडाला आणि जीव मुठीत धरून लोकांनी पळायला सुरूवात केली.
यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी एका हल्लेखोराचा खात्मा केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मँडले बे कॅसिनोच्या परिसरात हल्लेखोराचा शोध घेत आहोत. नागरिकांनी या परिसरापासून दूर राहावे, असे ट्विट लास व्हेगास मेट्रोपोलिटन पोलिसांनी केले आहे.
तसेच, स्टिफन पॅडॉक असे या 60 वर्षीय हल्लेखोराचे नाव आहे. त्याने अलिकडेच इस्लाम धर्म स्वीकारला होता. याचबरोबर, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे कृत्य राक्षसी असल्याचे म्हटले आहे. तसेच, ते लास वेगासला बुधवारी जाणार असून या हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची आणि जखमींची भेट घेणार आहेत.