काय विलक्षण योगायोग असतो पहा..अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून सतत या संसर्गाविषयी मनमानी विधाने केली. साधा मास्क वापरण्याबाबत ते स्वत: कधीही गंभीर नव्हते. अमेरिकेत रुग्णसंख्या वाढत असतानाही, त्यांनी कधीही गंभीरपणे या विषाणूच्या प्रसाराची चर्चा केली नाही. उलट वेगवेगळी तर्कटे लढवून ट्रम्प कोरोना प्रसाराचा धोका सतत मोडीत काढत राहिले... आता मात्र ते स्वत: आणि त्यांच्या पत्नी मेलानिया हे दोघेही कोरोनाबाधित झाल्याची माहिती जगभर पोहोचली. ही बातमी आली, नेमक्या त्याच दिवशी अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठाने एक अभ्यास प्रसिद्ध केला. हा अभ्यास म्हणतो की, ज्यांनी कोरोनाविषयी चुकीची माहिती प्रसवली त्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ट्रम्प यांचा प्रथम क्रमांक आहे. कोर्नेल अलायन्स फॉर सायन्स यांच्या एका गटाने दि. १ जानेवारी २०२० ते २६ मे २०२० दरम्यान जगभरात इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालेले ३ कोटी ८० लक्ष बातम्या, लेख पडताळून पाहिले. अमेरिका, इंग्लंड, भारत, आयर्लण्ड, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलण्ड आणि अन्य आफ्रिकी तसेच आशियाई देशात प्रसिद्ध झालेले हे लेख होते. त्यात या अभ्यासकांना एकूण ५,२२, ४७२ वृत्तलेख असे आढळले की ज्यामध्ये कोरोनाविषयी चुकीची माहिती तरी छापली आहे किंवा ती चुकीच्या पद्धतीने तरी छापली गेली आहे.
कोरोनाच्या बाबतीत चुकीची माहिती लोकांपर्यंत जाण्याच्या या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने ‘इन्फोडेमिक’ असं म्हटलं आहे. या अभ्यासात असं दिसतं की सर्वाधिक चुकीची माहिती आणि चर्चा झाली ती ‘मिरॅकल क्युअर’ या शब्दांची. ते शब्द वापरून ट्रम्प यांनी चुकीच्या माहितीत भर घातली आणि लोकांना चुकीची दिशा दाखवली. डिसइन्फेक्टण्ट्स वापरली तर शरीरात शिरलेला कोरोनाचा विषाणू नष्ट होऊ शकतो अशी विधानंही त्यांनी केली. हायड्रोक्लोरोक्विन या औषधाबाबतही त्यांनी चुकीची विधानं केली. (या अभ्यासात ट्रम्प यांच्या खालोखाल चुकीची माहिती पसरवणाऱ्या बातम्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे, हा अजून एक भाग.)
याच दरम्यान पहिली प्रेसिडेन्शियल डीबेट पार पडली. आणि टाकोटाक डोनाल्ड ट्रम्प हे सपत्नीक पॉझिटिव्ह आल्याची बातमी आली. ट्रम्प यांच्या विश्वासू सहकारी होप हिक्स याही पॉझिटिव्ह झाल्या आहेत. त्यांनीही राष्टÑाध्यक्षांच्या एअर फोर्स वन विमानातून त्यांच्यासोबत वॉशिंग्टन ते ओहायो असा प्रवास केला होता. मुख्य म्हणजे साºया प्रवासात त्यांनी एकदाही मास्क लावला नव्हता असं आता प्रसारमाध्यमं सांगतात. डीबेटच्या वेळीही हिक्स यांनी मास्क लावलेला नव्हताच. राष्टÑाध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी तोंडावर मास्क लावलेला होता मात्र डीबेट सुरू झाल्यावर त्यांनी तो काढून टाकला. तेच ट्रम्प यांचं, त्यांना तर बोलायचंच होतं, त्यामुळे त्यांनीही तोंडावर चढवलेला मास्क उतरवून ठेवला. दुसरीकडे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यो बायडन आणि त्यांच्या पत्नी जिल यांनी मात्र मास्क लावलेला होता आणि डीबेट सुरू झाल्यावरही श्रीमती बायडन यांनी आपला मास्क चेहºयावरून काढला नाही.ट्रम्प यांना संसर्ग झाल्याची बातमी येताच आता अनेकानेक शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत. अमेरिकन माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या एका बातमीत तर ट्रम्प आणि हिक्स दोघेही पॉझिटिव्ह आहेत, हे डीबेटपूर्वीच कळलं होतं; पण ती माहिती दडवण्यात आली. आणि बायडन यांचाही जीव धोक्यात घालण्यात आला- असा प्रश्नचिन्हांकित तर्क लावण्यात आला आहे. मुळात ट्रम्प यांच्या प्रचार-फळीने लढवलेली ही एक शक्कल असून, त्यांनी मुद्दामच ट्रम्प पती-पत्नी पॉझिटिव्ह झाल्याची हूल उठवून दिली आहे, अशी शंकाही अनेक माध्यमांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारातल्या मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष उडवता येईल आणि ते ट्रम्प यांच्या पथ्यावरच पडेल असं लोक म्हणतात.
ट्रम्प यांची जीवनशैली आधीच अनारोग्यकारक आहे. सत्तरीपार आहेत, शिवाय स्थूल आहेत. आता ते स्वत: पॉझिटिव्ह झाल्यावर तरी त्यांना या आजारातलं गांभीर्य कळेल का? अमेरिकन नागरिकांची या महामारीमुळे झालेली दैना त्यांना समजेल का? - असे प्रश्नही आता स्थानिक माध्यमं विचारत आहेत.