इस्लामाबाद : अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान दिल्लीला पाच मिनिटांत लक्ष्य करू शकतो, असा दावा पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक डॉ. अब्दुल कादीर खान यांनी केला आहे. पाकिस्तानच्या पहिल्या अणू परीक्षणाला रविवारी १८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना डॉ. खान म्हणाले, की पाकिस्तान १९८४ मध्येच अण्वस्त्र क्षमतेने सज्ज होऊ शकला असता; पण तत्कालीन राष्ट्रपती जनरल जिया उल हक यांनी या निर्णयाला विरोध केला. त्यावेळी चाचणी करण्यास परवानगी मिळाली असती, तर पाचच मिनिटांत दिल्ली खाक झाली असती, असे त्यांनी सूचित केले.डॉ. खान यांच्या नेतृत्वात १९९८ मध्ये अणूचाचणी घेण्यात आली होती. ८० वर्षीय खान म्हणाले की, १९७८ ते १९८८ पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्रपती राहिलेले जनरल जिया उल हक यांनी अणू चाचण्यास विरोध केला होता. खान म्हणाले की, रावळपिंडीच्या जवळ कहुटापासून पाच मिनिटांच्या आत दिल्लीला लक्ष्य करण्याची आमची क्षमता आहे. कहुटात कहुआ रिसर्च लॅबोरेटरीज आहे, जी पाकिस्तानचे प्रमुख युरेनियम केंद्र आहे. 2009 मध्ये उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने त्यांना पुन्हा पाकिस्तानात एक स्वतंत्र नागरिक म्हणून राहण्याचा अधिकार मिळाला. सध्या वादामध्ये असलेल्या पनामा पेपर्समध्ये डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या पत्नी तसेच अन्य नातेवाइकांची नावे आहेत. बोगस कंपनी स्थापन करून त्यांनी काळा पैसा तिथे वळवला, असा आरोप या कंपनीवर आहे. ते व त्यांची कंपनी चौकशीच्या फेऱ्यात आहेत.
...तर दिल्लीलाच लक्ष्य केले असते!
By admin | Published: May 30, 2016 4:10 AM