रात्रीची शांत झोप मिळणं हे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं; पण आजकाल रात्री उशिरापर्यंत जागणारे अनेक जण असतात. रस्त्यावर वाहतूक सुरू असते, निरनिराळे आवाज सुरू असतात. रात्रीच्या नीरव शांततेत कर्कश्श आवाज करत जाणारी मोटारसायकल किंवा अन्य वाहनं, शेजारी पाजारी सुरू असणाऱ्या पार्ट्या यामुळे अनेकांच्या झोपेचं खोबरं होतं; मात्र बहुतांश वेळा याकडे दुर्लक्ष केलं जातं.
इटलीतल्या एका जोडप्यानं मात्र शेजाऱ्यांच्या घरातून येणाऱ्या एका विचित्र आवाजानं झोपमोड होत असल्याबद्दल चक्क न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. विशेष म्हणजे त्यांच्या त्रासाची योग्य दखल न्यायालयाने घेतली आणि शेजाऱ्यांना या जोडप्याला ८ लाख रुपयांची नुकसानभरपाई (Italian Couple Get Rs 8 Lakh in Compensation from their neighbors) देण्याचा आदेश दिला; मात्र त्यासाठी या जोडप्याला तब्बल १९ वर्षं प्रतीक्षा करावी लागली.
इटलीतल्या गल्फ ऑफ पोएट्स (Gulf of Poets) या समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या नितांतसुंदर शहरात राहणाऱ्या एका जोडप्याची रात्रीची झोप उडाली होती ती त्यांच्या शेजाऱ्यांच्या अजब त्रासाने. चार भाऊ राहत असलेल्या त्या घराचं टॉयलेट आणि या जोडप्याची बेडरूम यांच्या भिंती लागून होत्या. त्यात शेजाऱ्यांच्या घरातल्या टॉयलेटच्या फ्लशचा आवाज अतिशय मोठा होता. त्यामुळे रात्री शेजारी कोणी टॉयलेटचा वापर केला, की फ्लशचा मोठा आवाज या जोडप्याला ऐकावा लागत असे. अनेकदा रात्री वारंवार असा आवाज कानावर आदळत असल्यानं त्यांना शांत झोप मिळणं मुश्कील झालं होतं. या जोडप्याची बेडरूम छोटी असल्यानं त्यांना आपल्या बेडची जागा बदलणंदेखील शक्य नव्हतं. दररोज रात्री होणाऱ्या या त्रासामुळे दोघंही अगदी त्रासून गेले होते. त्यांच्या झोपेचं खोबरं होत असल्यानं त्यांच्या कामकाजावर, दिनचर्येवरही परिणाम होत असे. अखेर वैतागून त्यांनी याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि २००३ मध्ये शेजाऱ्यांच्या या त्रासाविरुद्ध तक्रार दाखल केली. जवळपास 19 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आणि या जोडप्याला चक्क ८ हजार युरो म्हणजे साधारण ८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयानं शेजाऱ्यांना दिला.
या प्रकरणी न्यायालयानं दोन्ही घरांची पाहणी करण्याचे आदेश संबधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांनी शेजाऱ्यांच्या घरातल्या फ्लशचा आवाज त्रासदायक असल्याचा अहवाल दिला. त्यावर न्यायालयानं (Court) शेजारी राहणाऱ्या चार भावांना आपल्या घरातला फ्लश बदलून घेण्याची सूचना केली आणि या जोडप्याच्या शांत झोपेच्या हक्कावर गदा आणल्याबद्दल 8 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचाही आदेश दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नाराज असलेल्या शेजाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली; मात्र तिथंही न्यायाधीशांनी या जोडप्याच्या बाजूनेच निर्णय दिला. फ्लशचा आवाज नक्कीच रात्रीची झोप खराब करू शकतो. त्यामुळे शेजाऱ्यांनी या जोडप्याला ८ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी असा आदेश दिला.
न्यायालयाचा हा निर्णय शेजाऱ्यांच्या त्रासाला सामोऱ्या जाणाऱ्या अनेक नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. रात्रीची शांत झोप मिळणं हे माणसाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. झोप नीट झाली नाही तर त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात आणि त्याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याबाबत बेपर्वा असणाऱ्या व्यक्तींसाठी हा चांगला धडा आहे.