इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांनी आपल्यापेक्षा 53 वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी 'प्रतिकात्मक लग्न' केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोही व्हायरल होत आहेत. त्यात 85 वर्षीय बर्लुस्कोनी 32 वर्षीय मार्टा फॅसिनासोबत दिसत आहे. मार्टा फॅसिना या स्वतः खासदार आहेत.
हे लग्न मिलानच्या लेस्मो शहरातील महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण असलेल्या व्हिला गेर्नेटो येथे पार पडला. वारसा हक्कावरुन त्यांच्या कुटुंबामध्ये वाद असल्याने त्यांनी अधिकृतपणे लग्न केले नाही. बर्लुस्कोनीच्या या निर्णयावर त्यांची पाचही मुले नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर लग्नानंतर बर्लुस्कोनी यांच्या 417 अब्ज रुपयांच्या संपत्तीवर फॅसीनाचा हक्क येणार आहे.
फॅसिना यापूर्वी फ्रान्सिस्का पास्कलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण 2020 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर आता ती तिच्यापेक्षा 53 वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. इटालियन न्यूज साइट ANSA नुसार, फॅसिनाने कॅलेब्रियन भाषेत पदवी प्राप्त केली आहे. ती सोशल मीडियावरही चांगलीच लोकप्रिय आहे.
एका तरुण मुलीमध्ये बर्लुस्कोनीची आवड पाहून आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण यापूर्वी सेक्स वर्करसोबतही त्यांचे नाव जोडले गेले आहे. एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात साक्षीदाराला पैसे दिल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. नुकतेच माजी पंतप्रधान बर्लुस्कोनी यांच्यावर लैंगिक सेवेच्या बदल्यात मोरोक्कन सेक्स वर्करला 50 कोटी रुपये दिल्याचा आरोप झाला होता. पण तो आरोप सिद्ध होऊ शकला नाही.
बर्लुस्कोनी यांच्यावर 2013 मध्येही कर फसवणुकीचा आरोप होता. त्यानंतर सरकारी कार्यालयात त्यांच्या नियुक्तीवर बंदी घालण्यात आली. ते अनेक गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातही आरोपी आहे. बर्लुस्कोनी यांच्या प्रकृतीबाबत विविध प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत असतात. प्रकृतीचे कारण देत त्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीतून आपले नाव मागे घेतले. त्यानंतर सर्जियो मॅटारेला यांना इटलीचे नवे प्रमुख बनवण्यात आले.