चीनमधीलकोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चीनपाठोपाठइटलीमध्येकोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इटलीत कोरोनाची दहशत पसरली आहे. दरम्यान, इटलीतील बर्गामो शहरातील एका वृत्तपत्राने ९ फेब्रुवारी रोजी दीड पान श्रद्धांजलीच्या जाहिराती छापल्या होत्या. त्यानंतर आता १३ मार्च रोजी याच वृत्तपत्राने तब्बल १० पाने श्रद्धांजलीच्या जाहिराती छापल्यामुळे जगभरातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.
सिल्विया मेर्लेर यांनी ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बर्गामोमधील वृत्तपत्र चाळतानाचा व्हिडिओ दाखविण्यात आला आहे. या व्हिडिओत तब्बल १० पाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांविषयी श्रद्धांजली व्यक्त करण्यात आल्याच्या जाहिराती छापण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिल्व्हिया मेर्लेर यांनी घरीच थांबा असा सल्ला सर्वांना दिला आहे.
दरम्यान, इटलीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. एका दिवसात इटली कोरोनामुळे इतके लोक मृत्यू झाले जेवढे दुसऱ्या महायुद्धातही एका दिवसात झाले नाहीत. रविवारी दिवसभरात २४ तासांत इटलीत ३६८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांचा हा आकडा सगळ्यात मोठा आहे.
कोरोनामुळे जगभरात १ लाख ६९ लोक बाधित झाले आहेत. यातील ६५०० लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. चीनमध्ये ३२०० तर इटलीत १८०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही सोमवारपर्यंत ११६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यात एकट्या महाराष्ट्रात ३७ जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे देशात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मॉल्स, शाळा, सिनेमागृह आदी सर्व बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.