रोम - इस्लामिक संस्कृती आणि यूरोप कल्चरमध्ये काहीही साम्य नाही. त्यामुळे यूरोपात इस्लामला काही जागा नाही. इटलीच्या इस्लाम सांस्कृतिक केंद्रांना सौदी अरबकडून फंडिग होत आहे जिथं शरिया कायदा लागू आहे. यूरोपाचं इस्लामीकरण सुरू आहे जे आमच्या सभ्यतेच्या मूल्यांपासून दूर आहे त्यामुळे मुस्लिमांनी यूरोपापासून दूर राहावं असं वादग्रस्त विधान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केले आहे.
पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या की, आमची सभ्यतेचे मूल्य आणि इस्लामी मूल्य यामध्ये साधर्म्य नाही. या दोन्ही संस्कृती परस्परविरोधी आहेत असं त्यांनी सांगितले. जॉर्जिया मेलोनी यांचे हे विधान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या वक्तव्यानंतर समोर आले आहे. बेकायदेशीर प्रवाशांपासून यूरोपीय संस्कृतीला धोका असल्याचे सुनक यांनी म्हटलं होते. पंतप्रधान ऋषी सुनक हे अलीकडेच इटली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अवैधरित्या यूरोपमध्ये वाढणाऱ्या प्रवासी संख्येवर त्यांनी भाष्य केले. अवैध प्रवाशांकडून यूरोपमध्ये वाढणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात असं त्यांनी म्हटलं.
जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिला महिला पंतप्रधान आहेत. त्या दक्षिणपंथी पार्टी ब्रदर्स ऑफ इटलीच्या नेत्या आहेत. ३१ व्या वर्षी इटलीत सर्वात युवा मंत्री बनण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. आपल्या विधानांमुळे मेलोनी कायम चर्चेत राहतात. मेलोनी स्वत:ला मुसोलिनीचे वारस असल्याचे सांगते. ज्यावर अनेकदा त्यांना टीका सहन करावी लागली आहे. एका विधानात जॉर्जिया यांनी मुस्लीम इटलीसाठी धोकादायक असल्याचे म्हटलं होते. जॉर्जिया मेलोनी यांचं खासगी जीवनही बऱ्याचदा चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एंड्रिया गिआम्ब्रुनो यांच्याशी नाते संपवले. जवळपास १० वर्षानंतर मेलोनीने ब्रेकअप केल्याचे जाहीर केले.
जॉर्जिया मेलोनी भारतातही चर्चेत असतात. जी-२० च्या शिखर संमेलनावेळी मेलोनी भारतात आल्या होत्या. तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. तर नुकतेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमानिमित्त दुबईत सर्व देशांचे प्रतिनिधी आले होते. तेव्हा मेलोनी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत घेतलेला सेल्फी सोशल मीडियात ट्रेंड झाला होता.