तंत्रज्ञान हे शाप की वरदान, हा प्रश्न आजकाल अनेकदा, अनेक ठिकाणी उपस्थित होतो. तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुलभ, वेगवान झालं आहे, हे तर खरंच. ज्या गोष्टी आजवर आपल्याला कल्पनेतही शक्य नव्हत्या, त्या अनेक गोष्टी आपण अगदी सहजपणे आपल्या आयुष्यात वापरतोय. तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागात तर अक्षरश: क्रांती झाली. कोरोनाकाळातलंच उदाहरण घ्यायचं तर शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीनं ज्या तऱ्हेनं अनेक गोष्टी पोहोचल्या, सुलभ झाल्या त्याची आपण पूर्वी कल्पनाही करू शकलो नसतो. या काळात लक्षावधी विद्यार्थी केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीनंच शिक्षणक्षेत्रात राहू शकले. तंत्रज्ञान ज्या पद्धतीनं आपण वापरू त्यानुसार ते शाप की उ:शाप हे ठरतं. डीपफेक हे असंच एक तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक गोष्टी सहज, सोप्या झाल्या. पण, ज्यांनी त्याचा उपयोग अप्रामाणिकपणे, दुसऱ्यांना बदनाम करण्यासाठी केला, त्यामुळे त्या व्यक्तींचं आयुष्य कसं बरबाद झालं याच्या अनेक कहाण्या आपण रोज ऐकतो आणि पाहतोही.
अगदी ताजं उदाहरण म्हणजे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही प्रतिमा या डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं खराब करण्यात आली. डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांचा एक बनावट अश्लील व्हिडीओ तयार करून अमेरिकेतील एका ॲडल्ट कन्टेन्ट वेबसाइटवर पोस्ट करण्यात आला. लक्षावधी लोकांनी तो पाहिला. या बनावट व्हिडीओमुळे त्यांच्या चारित्र्याचं हनन झालं. ज्यांनी हा व्हिडीओ तयार केला होता, त्यांच्यापर्यंत पोलिस पोहोचले आणि त्यांना अटकही करण्यात आली. एका ४० वर्षांच्या इसमानं आपल्या ७३ वर्षांच्या पित्याच्या मदतीनं हा बनावट व्हिडीओ तयार केला होता. या दोघांवर आता खुद्द पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीच एक लाख युरोचा (साधारण एक कोटी रुपये) अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. हा दावा आपण जिंकूच याची त्यांना खात्री आहे; कारण, सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. या दाव्यातून मिळालेली रक्कम अशा प्रकारच्या बदनामीचा त्रास सहन कराव्या लागणाऱ्या महिलांना त्या देणार आहेत.
पण, हे डीपफेक तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय? या तंत्रज्ञानाच्या नावातूनच त्याच्या बनावटगिरीची कल्पना येते. डीपफेक व्हिडीओ हा एक प्रकारचा बनावट, काही गोष्टी एकत्र करून तयार केलेला व्हिडीओ असतो. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुसऱ्याच व्यक्तीचा चेहरा लावून एखादी कृती ती व्यक्तीच करीत आहे, असा आभास त्यातून निर्माण केला जातो. या माध्यमातून चेहरा, आवाज, हावभाव यासारख्या अनेक गोष्टी बदलता येतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे टूल्स वापरून इतक्या सफाईनं त्यात एडिटिंग केलं जातं की खरा व्हिडीओ कोणता आणि खोटा व्हिडीओ कोणता याची पुसटशी शंकाही कोणाला येत नाही.
अगदी त्यातल्या तज्ज्ञांनाही सहजपणे ते समजून येत नाही. पूर्वी फक्त फोटोवरच अशा पद्धतीनं मॉर्फिंग केलं जायचं; पण, आता व्हिडीओंमध्येही चक्क माणूसच ‘बदलला’ जातो. असा प्रकार मुख्यत: अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी पोर्नोग्राफीमध्ये केला जातो. कोणाचाही साधा फोटो किंवा व्हिडीओ या तंत्रज्ञानाच्या मदतीनं न्यूड फोटो किंवा व्हिडीओत बदलता येऊ शकतो. त्याचाच फायदा घेऊन आजपर्यंत अनेक भामट्यांनी अनेक महिलांना बदनाम केलं आहे, त्यांच्याकडून मोठी खंडणी उकळली आहे, त्यांच्या चारित्र्याचे धिंडवडे उडवले आहेत आणि त्यांना अक्षरश: आयुष्यातूनच उठवलं आहे.
पंतप्रधान मेलोनी यांनी जी अब्रूनुकसानीची रक्कम मागितली आहे, ती प्रतीकात्मक आहे. अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना हिंमत देण्यासाठी, त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवावा, यासाठी मेलोनी यांनी हा दावा दाखल केला आहे. अशा महिलांच्या मदतीसाठी एक विशेष निधीही तयार करण्यात आला आहे. त्या निधीत ही रक्कम टाकण्यात येईल. २०२२मध्ये मेलोनी यांचा बनावट व्हिडीओ अश्लील वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता. लाखो लोकांना त्यामुळे धक्का बसला होता. इटलीच्या कायद्यानुसार अशा प्रकारच्या गुन्ह्यात अपराध्याला कठोर शिक्षेची तरतूद आहे.