पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी या परिषदेच्या सर्व कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी, 'मेलोडी टीमकडून हॅलो', असे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी मागे हसताना दिसत आहेत.
महत्वाचे म्हणजे, इटलीच्या पंतप्रधान मेलोनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी पीएम मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर करत 'मेलोडी' हॅशटॅग ट्रेंड वापरला होता. तेव्हापासूनच हा ट्रेंड चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा इटलीच्या मेलोनी यांनी या ट्रेंडसह एक व्हिडिओ X वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ रिट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी, 'भारत आणि इटलीची मैत्री सदैव कायम राहो,' असे लिहिले आहे.
दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चापरराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चेबाबत एक निवेदन जारी केले आहे. या द्विपक्षीय चर्चेवेळी दोघांनी भारत आणि इटलीमधील धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावाही घेतला. उभय नेत्यांनी स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दूरसंचार, एआय आणि खनिजांच्या क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. तसेच, या चर्चेवेळी नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या महायुद्धात इटलीच्या मोहिमेतील भारतीय लष्कराचे योगदान मान्य केल्याबद्दल इटली सरकारचे आभार मानले. याशिवाय, भारत सरकार इटलीतील मॉन्टोन येथे यशवंत घाडगे (दुसऱ्या महायुद्धातील शहीद योद्धे) यांचे स्मारक विकसित करणार असल्याचे जाहीर केले.