इटलीतील मिलान शहरात रविवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका लहान विमानाचा भीषण अपघात झाला आहे. धावपट्टीवर उतरण्याआधी एक लहान विमान मिलान येथील दुमजली इमारतीला धडकले. या अपघातात एका लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. विमानाची धडक झाल्यानंतर या इमारतीला आग लागली. या इमारतीच्या जवळ असणाऱ्या वाहनांनाही आगीची झळ बसली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात विमानातील प्रवाशांशिवाय इतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमान धडकलेली इमारत रिकामी होती. त्यामुळे सुदैवाने मोठ्या प्रमाणावरील जीवितहानी झाली नाही. पण इमारत मेट्रो रेल्वे स्टेशनच्या जवळ होती. इमारतीजवळ उभ्या असलेल्या वाहनांमध्ये चालक अथवा प्रवासी नव्हता.
'लाप्रेस' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या लहान विमानातील पायलटसह आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. सरकारी वृत्तवाहिनी 'राय टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानातील प्रवासी फ्रान्सचे नागरिक असण्याची शक्यता आहे. विमानातील प्रवाशांशिवाय इतर कोणाचाही यामध्ये मृत्यू झालेला नाही.
मिलानजवळील सान डोनाटो मिलानीज या लहान शहरात हा अपघात झाला. विमान दोन मजली इमारतीला धडकल्यानंतर आग लागली. आगीमुळे निर्माण झालेले धुराचे लोळ काही किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. अपघातग्रस्त विमानाने मिलानच्या लिनेट विमानतळ आणि इटलीतील सारिदिनिया बेटादरम्यान उड्डाण घेतले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.