नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू इटली येथे झाले आहेत. आतापर्यंत इटलीत १३ हजारहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर एक लाखहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र इटलीत एक गाव असं आहे, जिथे कोरोना व्हायरस अद्याप पोहोचू शकला नाही.
इटलीच्या पूर्व भागातील पियोदमॉन्टमधील तुरीन शहराजवळील मोंताल्दो तोरीनीज असं या गावाचे नाव आहे. येथील लोकांच्या म्हणण्यांनुसार गावात जादुई पाणी असल्यामुळे एकही कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आढळून आला नाही. या गावातील पाण्याने नेपोलियन बोनापार्टच्या सैनिकांचा न्यूमोनिया देखील बरा झाला होता, अशी अख्यायिका आहे.
मोंताल्दो तोरीनीज गाव तुरीनपासून केवळ १९ किमी अंतरावर आहे. तुरीनमध्ये शनिवारी कोरोनाचे ३६५८ रुग्ण आढळून आले. तर पियोदमॉन्ट परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे. येथे ८ हजार २०६ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.
पियोदमॉन्टचे महापौर सर्गेई गियोत्ती यांनी सांगितले की, मोंताल्दो तोरीनीज येथील स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी यामुळे येथील सर्व लोक पूर्णपणे ठीक आहेत. गावातील विहिरीच्या पाण्याने नेपोलियनच्या सैन्याचा न्युमोनिया ठिक झाला होता, असा दावा सर्गेई गियोत्ती यांनी केला. मोंताल्दो तोरीनीज गावाची लोकसंख्या केवळ ७२० आहे.
मोंताल्दो तोरीनीज गावातील अनेक लोक तुरीनला जातात. तुरीनमध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. मात्र येथील स्वच्छ हवा आणि पाणी तसेच येथील जीवनशैली यामुळे कोरोनाचा या गावात प्रसार होऊ शकला नसल्याचे गियोत्ती यांनी सांगितले. तसेच या गावातील सर्व कुटुंबांना मास्क देण्यात आले असून गावातील सर्वांना नियमीत हात धुण्याचे आवाहन देखील केल्याचे गियोत्ती यांनी म्हटले.