न्यूयॉर्क : अमेरिकेच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील अब्जाधीश हॅरी मॅकलोव व त्याची पहिली पत्नी लिंडा यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणातून जगातील सर्वात मोठा म्हणजे ७ हजार ७०० कोटी रुपयांचा लिलाव व्यवहार झाला आहे. मॅकलोव यांच्या संग्रहातील ३० कलाकृतींच्या सद्बी या संस्थेने नुकत्याच केलेल्या लिलावातून इतकी मोठी रक्कम मिळाली आहे. मॅकलोव व लिंडा यांचा घटस्फोट झाल्यानंतर या कलात्मक वस्तूंची विक्री करण्याचे काम सद्बीला देण्यात आले होते.
मॅकलोव आणि लिंडा यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू असताना न्यायालयाने मॅकलोव व लिंडा यांच्या संग्रहातील कलात्मक वस्तूंपैकी काहींचा लिलाव करण्याचा आदेश २०१८मध्ये दिला. त्यावेळी या अब्जाधीशाकडील ३५ कलाकृतींच्या लिलावातून ५ हजार २०० कोटी रुपये मिळाले होते. त्यानंतर त्यांच्या संग्रहातील ३० वस्तूंचा दुसरा लिलाव नुकताच होऊन त्यातून ७ हजार ७०० कोटी रुपये मिळाले. जगभरात लिलावातून एकाचवेळी एवढी रक्कम आजवर कधीही मिळाली नव्हती. या रकमेतील ज्याचा-त्याचा योग्य वाटा मॅकलोव व लिंडा यांना मिळणार आहे.
पाच दशकांच्या वैवाहिक आयुष्यानंतर घटस्फोट
मॅकलोव व लिंडा यांचे ४ जानेवारी १९५९ रोजी लग्न झाले. पाच दशकांच्या वैवाहिक जीवनानंतर लिंडा यांनी २०१६मध्ये घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला. २०१९पासून दोघेही परस्परांपासून वेगळे झाले. त्यानंतर हॅरी मॅकलोव यांनी पेट्रिशिया लझार या महिलेशी दुसरा विवाह केला.
न्यूयॉर्कमधील अनेक गगनचुंबी इमारतींचे मालक
अब्जाधीश हॅरी मॅकलोव हे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ४४० मॅडिसन ॲव्हेन्यू, ५४० मेडिसन ॲव्हेन्यू, ड्रेक हॉटेल, टू ग्रँड हाॅटेल टॉवरसहित अनेक गगनचुंबी इमारतींचे मालक आहेत. २०१९च्या फोर्ब्स यादीनुसार मॅकलोव व त्यांची पहिली पत्नी लिंडा यांची संपत्ती ७० ते ८५ हजार कोटी रुपये इतकी होती. (वृत्तसंस्था)