प्रेम कशाला म्हणावं, प्रेम कोणी कोणावर करावं आणि या प्रेमाची परिणिती शेवटी कशात होते?... प्रेमाच्या अनेक ‘व्याख्या’ केल्या जातात, जातिवंत प्रेमाची अनेक उदाहरणं आणि दाखलेही दिले जातात, प्रेम असावं तर या जोडप्यासारखं.. असं म्हणत लैला-मजून, शिरीं-फरहाद, रोमियो-जुलियट, सोहनी-महिवाल यांच्या मनस्वी प्रेमाच्या कहाण्याही आपण आजवर ऐकत आलो आहोत.
पण अलीकडे काय चित्र दिसतं? जिच्यावर प्रेम केलं, जिच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत, अगदी त्यानंतरही आम्ही सोबतीनंच राहू, अशी आश्वासनं दिली, त्या आपल्या प्रेमिकेला कसं वागवलं जातं? निदान सध्या तरी अशा घटना मुख्यत्वे मुली, तरुणींच्या बाबतीतच घडताना दिसताहेत. अंगावर शहारे आणणाऱ्या अशा घटनांनी सध्या आपण सुन्न होतोय.
त्यावरही कडी करणारी एक घटना नुकतीच ब्रिटनमध्ये घडली. या क्रौर्यानं अख्ख्या जगालाच जणू धक्का बसला आहे. ही घटना नेमकी आहे तरी काय? - ब्रिटनमधील निकोलस मेटसन आणि हॉली ब्रेमली हे एक जोडपं. त्यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी लग्न केलं. अर्थातच लग्नापूर्वी त्या दोघांनीही सुखी संसाराची आणि सुखी आयुष्याची खूप स्वप्नं बघितली, पण लग्नानंतर काहीच दिवसांत त्यांच्यात खटके उडायला लागले आणि प्रकरण लगेच घटस्फोटासाठी कोर्टातही गेलं. पण त्याआधीच २८ वर्षीय निकोलसनं आपल्या २६ वर्षीय पत्नी हॉलीला अतिशय क्रूरपणे संपवलं. त्यांच्या लग्नाला दीड वर्षही झालं नव्हतं आणि घटस्फोटाबाबत कोर्टाचा निकालही आला नव्हता, पण तेवढीही वाट न पाहता, निकोलसनं हॉलीला आयुष्यातून उठवलं.
हॉली आणि निकोलस यांचं नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न झालं होतं, पण त्यानंतर सोळा महिन्यांतच मार्च २०२३ मध्ये त्यानं हॉलीचा खून केला. ज्या पद्धतीनं निकोलसनं हॉलीवर हल्ला केला आणि त्यानंतर तिच्या शरीराचं त्यानं जे काही केलं, ते पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. निकोलसनं आधी हॉलीवर चाकूनं सपासप वार केले. ती मेल्यानंतरही तो तिच्यावर चाकूचे वार करीतच होता. त्यानंतर त्यानं हॉलीच्या शरीराचे तब्बल २२४ तुकडे केले. काही दिवस ते घरातच फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर त्यानं ते एका बॅगमध्ये भरले आणि नदीत फेकून दिले.
त्याहूनही घृणास्पद गोष्ट म्हणजे हॉलीला मारण्याआधी त्यानं इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च केल्या. एखाद्याचा खून कसा करायचा, याच्या टिप्स त्यानं सर्च केल्या नव्हत्या, तर बायकोला मारण्याचे फायदे काय? बायकोचा खून केल्यानंतर आपल्याला काय पुण्य मिळतं? पण त्याहीपेक्षा विशेष म्हणजे मेल्यानंतर बायको आपल्याला त्रास देते का, याविषयी त्यानं इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलं होतं! हॉलीला मारल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेले तिच्या शरीराचे तुकडे बॅगेत भरून ही बॅग नदीत फेकण्यासाठी मित्राला त्यानं पाच हजार रुपये दिले.
हॉलीच्या आईनं कोर्टात सांगितलं, लग्नाच्या आधी तर दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं, किंबहुना त्यामुळेच आम्ही लग्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं, पण लग्नानंतर असा एकही दिवस गेला नाही की त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं नाही. दोघंही रोज खूप भांडायचे. निकोलसनं तर हॉलीच्या लाडक्या पाळीव प्राण्यांनाही मारून टाकलं होतं. त्यातली काही प्राणी छोटी तर काही पिल्लं होती.
निकोलसची किळसवाणी, क्रूर निर्दयता इतकी की त्यानं हॅमस्टरसारखे हॉलीचे काही लाडके प्राणी चक्क फूड ब्लेंडरमध्ये टाकले होते, काही मायक्रोवेव्हमध्ये जिवंत भाजले होते, तर एका पिल्लाला वॉशिंग मशीनमध्ये टाकून मशीन सुरू करून मारलं होतं! हॉलीच्या आईनं सांगितलं, निकोलसनं हॉलीच्या लाडक्या प्राण्यांना मारून टाकल्यानंतर हॉलीनं निकोलसविरुद्ध पोलिसांतही तक्रार केली होती. त्यानं पोलिसांना सांगितलं, प्राण्यांना मारल्याचं जाऊ द्या, मीच इथे रोज मार खातोय. माझी बायको मला मारते. घरगुती हिंसाचाराचा मीच मोठा शिकार आहे! आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यानं हातावरची एक जखमही पोलिसांना दाखवली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार निकोलसला ‘ऑटिझम स्पेक्ट्रम’ नावाचा मनोविकार आहे. अशा व्यक्ती एकट्या असताना किंवा कोणाशी संपर्क न झाल्यास स्वत:लाही इजा पोहोचवू शकतात.