अमिताभ बच्चन यांचा ‘दीवार’ चित्रपट आठवतो? या चित्रपटात एका सीनमध्ये, ‘विजय’ला त्याच्या खिशात असलेला ‘बिल्ला नंबर 786’ गुंडांच्या गोळीबारापासून वाचवतो. अगदी अशीच एक घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. येथे काही लुटारुंनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. पण त्याचे नशीब एवढे चांगले होते, ती गोळी त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलमध्ये अडकली. आणि त्याचा जीव वाचला. येथील स्थानिक डॉक्टरने त्याच्या मोबाइलचा फोटो आणि घटनेची माहिती ट्विटरवर शेअर केली, असून ती मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा मोबाइल तर ‘बुलेटप्रूफ’ निघाला!हे फोटो ब्राझीलमधील डॉक्टर @Oparbento1 यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी लिहिले आहे, की ‘लुटीदरम्यान गोळी लागल्यानंतर संबंधित व्यक्तीला ER (इमरजन्सी रूम) मध्ये दाखल करण्या आले होते. नशिबाने गोळी त्याच्या फोनमध्येच अडकली होती.’ या ट्विटला मोठ्या प्रमाणावर लाइक आणि शेअर मिळत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण ? -‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ब्राझीलच्या पेरनाम्बुको राज्यातील पेट्रोलीना येथे घडली. येथे एका व्यक्तीला एका लुटारूने गोळी मारली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच फरार झाला. यानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांच्या निदर्शनास आले, की संबंधित रुग्णाला गोळी लागूनही नॉर्मल जखम झाली आहे. कारण त्याच्या खिशात असलेल्या Motorola च्या मोबाइलने त्याचे ढाल बनून संरक्षण केले.
संबंधित डॉक्टरने रुग्णाच्या प्रकृतीसंदर्भात ट्विट करत सांगितले, की, ‘बरेचसे लोक संबंधित व्यक्तीसंदर्भात विचारणा करत आहेत. डॉक्टरांनी पुष्टी केली, की त्याच्या कंमरेखालील भागात नॉर्मल दुखापत झाली होती. आता त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.