कोरोनामुळे संपूर्ण जग वेठीस धरलं गेलं. महामारीमुळे माणसाची विचारसरणी, दैनंदिन आयुष्य, खाणंपिणं सारंकाही बदललं. विषाणूची लागण होऊ नये, त्याचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक बंधनं सर्वांवर आली. यातच कामकाजासाठी नवे पर्याय शोधले गेले आणि 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) संस्कृती ला चालना मिळाली. गेल्या दोन वर्षात 'वर्क फ्रॉम होम'चं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. पण त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या तक्रारी देखील समोर येऊ लागल्या आहेत. आता तर एका देशानं 'वर्क फ्रॉम होम'बाबत केलेल्या नव्या कायद्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पोर्तुगाल सरकारनं 'वर्क फ्रॉम होम'शी संबंधित कायद्याचा एक असा मसुदा तयार केलाय की ज्याची आता जगभर चर्चा होऊ लागली आहे. पोर्तुगाल सरकारनं सादर केलेल्या मसुद्याला जर मान्यता मिळाली तर या कायद्यानुसार 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या कामकाजाच्या वेळेनंतर बॉस किंवा त्याच्या सिनिअरनं कामासाठी फोन केला तर त्याबाबत शिक्षा होऊ शकते.
पोर्तुगालमध्ये अजूनही 'वर्क फ्रॉम होम'कोरोना महामारीमुळे जगभरातील इतर देशांप्रमाणे पोर्तुगालनं देखील बऱ्याच उपाय योजना केल्या. यात सरकारी आणि खासगी कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी देखील सरकारनं पावलं उचलली. पोर्तुगालमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर कंपन्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात 'वर्क फ्रॉम होम'चा मार्ग अवलंबण्याचे आदेश दिले. पोर्तुगालमध्ये अजूनही अनेक सरकारी कार्यालयं सुरू झालेली नाही. वर्क फ्रॉम होमचं प्रमाण जास्त आहे. कार्यालयाच्या साफ-सफाईसाठी दोन ते तीन महिन्यांमध्ये एकदा सफाई कर्मचारी कार्यालय उघडतात आणि साफसफाईनंतर कार्यालयाला पुन्हा टाळं लावलं जातं.
कर्मचाऱ्यांसाठी कायद्याची गरज का भासली?कोणत्याही व्यक्तीचं मानसिक आणि शारीरीक स्वास्थ्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टीकोनातून पोर्तुगाल सरकारनं कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात समन्वय राखण्यासाठी नव्या कायद्याची ब्लू-प्रींट तयार करण्याचा निर्णय घेतला. नव्या कायद्याच्या ब्लू-प्रींटनुसार आता पोर्तुगालमध्ये कोणत्याही कार्यालयातील सिनिअर व्यक्ती किंवा बॉस त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला, ज्युनिअरला 'वर्क फ्रॉम होम'ची शिफ्ट संपली की फोन कॉल करु शकत नाही.
शिफ्ट संपल्यानंतर कोणत्याही सिनिअरनं किंवा बॉसनं कर्मचाऱ्याला कामासाठी फोन केला तर त्याच्यावर कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला जाईल. कायदेशीर कारवाईस संबंधित व्यक्ती पात्र ठरणार आहे. पोर्तुगालच्या श्रम आणि सामाजिक सुरक्षा मंत्री Ana Mendes Godinho यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या माहामारीत वर्क फ्रॉम होमची खूप मदत झाली. म्हणूनच रिमोट वर्किंगला जास्त सोपं बनवण्यासाठी हा अध्यादेश लावण्यात आला आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, हा कायदा अनेक युरोपीय देशांमध्ये असून फ्रांस, जर्मनी, इटली, स्लोवाकियामध्ये अशा कायद्याला परवानगी देण्यात आली आहे. अशात पोर्तुगाल कर्मचाऱ्यांना फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी सरकारनं ही योजना आखल्याची चर्चा आहे.