नवी दिल्ली – भारताच्या दबावापुढे अखेर ब्रिटन झुकला आहे. भारतात बनलेली कोविशील्ड(Covishiled) लसीला यूकेने मान्यता दिली आहे. याबाबत नव्या ट्रॅव्हल गाइडलायन्स जारी करण्यात आल्या आहेत. परंतु याने फारसा बदल होणार नाही. जर कुठल्याही भारतीयाने कोविशील्डची कोरोना लस घेतली असेल तर तो यूकेला येऊ शकतो परंतु त्याला क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. सर्टिफिकेशनच्या मुद्द्यावरून अद्याप चर्चा झाली नसल्याचं यूकेने सांगितले.
नव्या गाइडलायन्समध्ये काय आहे?
यूकेच्या नव्या ट्रॅव्हल गाइडलायन्सची अंमलबजावणी ४ ऑक्टोबरपासून होणार आहे. ही गाइडलायन्स काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आली होती. परंतु यात कोविशील्ड लसीला मान्यता देण्यात आली नव्हती. ज्यावरुन खूप वाद झाला. आता याबाबत नव्या गाइडलायन्समध्ये कोविशील्डला परवानगी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यात चार लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्यात एस्ट्राजेनिका कोविशील्ड, एस्ट्राजेनेका वैक्सेजेवरिया, मॉडर्ना टाकेडा यांना परवानगी देण्यात आली आहे.
पूर्वीच्या आदेशात ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या आत्ताही आहेत. त्यात यूके, युरोप, अमेरिका यांच्या लसीकरण मोहिमेनुसार ज्यांनी लसीकरण केले आहे त्यांनाच फुली व्हॅक्सिनेटेड मानलं जाईल. पुढे म्हटलंय की, ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका, फायजर बायोएनटेक, मॉडर्ना आणि जेनसेन लसीला मान्यता देण्यात आली आहे. ही लस ऑस्ट्रेलिया, एंटिगुआ आणि बारबुडा, बारबाडोस, बहरिन, ब्रुनई, कॅनडा, डोमिनिका, इस्ज्ञाईल, जपान, कुवैत, मलेशिया, न्यूझीलंड, कतार, सौदी अरब, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तायवानसारख्या आरोग्य विभागाकडून घ्यायला हवी.
काय आहे प्रकरण?
भारतात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन प्रमुख लसी नागरिकांना देण्यात येत आहेत. परंतु या लसी घेतलेल्या लोकांना ब्रिटनला जाण्यापासून वंचित राहावं लागलं होतं. भारतातील या दोन्ही लसींना ब्रिटनला मान्यता दिली नव्हती. विशेष म्हणजे कोविशील्ड ज्या सीरम इन्स्टिट्यूटनं बनवली आहे. तीच ब्रिटनमध्ये एस्ट्राजेनिका ऑक्सफोर्ड नावानं ओळखली जाते. तरीही कोविशील्डला परवानगी देण्यात आली नाही. याबाबत भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी आक्षेप घेतला होता. कोविशील्डला मान्यता न देऊन ब्रिटननं भेदभाव केला आहे. यूकेचं हे धोरण भारतीय नागरिकांसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे भारत ब्रिटनशी याबाबत चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले होते.