सिंगापूर, दि.1- भारतीय वंशाचे ज्येष्ठ सनदी अधिकारी जे. वाय पिल्ले यांची सिंगापूरच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष निवड झाली आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत ते या पदावरती राहतील. जे. वाय पिल्ले 83 वर्षांचे आहेत.
टोनी टॅन केंग याम यांनी राष्ट्रपतीपदाची 6 वर्षे पूर्ण केल्यानंतर जे. वाय पिल्ले यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली. पिल्ले हे कौन्सील ऑफ प्रेसिडेंशियल अॅडवायजर्सचे अध्यक्ष असून मतदानाचा दिवस 23 सप्टेंबर पर्यंत किंवा जर अध्यक्षपदाचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यास 13 सप्टेंबर पर्यंत कामकाज पाहतील. पिल्ले यांना ही जबाबदारी सांभाळणे फारसे नवे नाही कारण ज्या ज्या वेळेस राष्ट्राध्यक्ष परदेश दौऱ्यावर जात तेव्हा पिल्ले यांनी ही जबाबदारी पार पाडलेली आहे. यंदाच्या मे महिन्यात टॅन युरोपच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हाही पिल्ले यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. अशा प्रकारची जबाबदारी पिल्ले यांच्यावर 60 वेळा आलेली आहे. 2007 साली राष्ट्राध्यक्ष एस. आर. नाथन आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले असताना सलग 16 दिवस जे. वाय पिल्ले या पदावरती होते. हा त्यांना मिळालेला हंगामी अध्यक्षपदाचा सर्वाधीक काळ म्हणावा लागेल. मलाय वंशाचे तीन उमेदवार नव्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. यावर्षी राष्ट्राध्यक्षपद अल्पसंख्यांकांसाठी राखीव ठेवले गेले आहे.
जे. वाय पिल्ले यांचे संपुर्ण नाव जोसेफ युवराज पिल्ले असे आहे. त्यांचा जन्म 1934 साली क्लांग येथे (सध्या मलेशिया) येथे झाला. इंटरनॅशनल कॉलेज ऑफ सायन्स अॅंड टेक्नॉलजी, लंडन विद्यापिठ येथे त्यांनी शिक्षण घेतले. पिल्ले हे सर्वोत्तम ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात. सिंगापूरचे संस्थापक पंतप्रधान ली कुआन यू हे त्यांना ' इक्वल टू द बेस्ट ब्रेन्स इन अमेरिका ' असे संबोधत असत. पिल्ले यांनी अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि राष्ट्रीय विकास या मंत्रालयांमध्ये पर्मनंट सेक्रेटरी म्हणून कामकाज पाहिले होते. ते सिंगापूर एक्स्चेंज, डीबीएस बॅंकेचे अध्यक्षही होते. तसेच जीआयसी आणि मॉनेटरी अथॉरिटी आफ सिंगापूरचे ते व्यवस्थापकीय संचालकही होते. पिल्ले हे सिंगापूर एअरलाइन्सचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. 1972 साली केवळ 12 विमानांसह सुरु झालेली ही विमानसेवा आज जगातील उत्कृष्ठ विमानसेवांपैकी एक म्हणून ओळखली जाते. पिल्ले यांच्या काळातच सिंगापूर एअरलाइन्सची भरभराट झाली. पिल्ले यांनी सिंगापूर एअरलाइन्सच्या अध्यक्षपदाचा कार्यभार 1996 पर्यंत सांभाळला. पिल्ले हे सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेची उभारणी करणाऱ्या सुरुवातीच्या लोकांपैकी एक आहेत.