Elon Musk चं खासगी जेट ट्रॅक करणाऱ्या तरुणाची आता पुतीन यांच्यावर 'नजर'!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 07:47 PM2022-03-01T19:47:54+5:302022-03-01T19:48:59+5:30
जॅक स्वीनी (Jack Sweeney) नावाच्या एका १९ वर्षीय तरुणानं नुकतंच काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क यांच्या खासगी जेटला ट्रॅक करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
जॅक स्वीनी (Jack Sweeney) नावाच्या एका १९ वर्षीय तरुणानं नुकतंच काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क यांच्या खासगी जेटला ट्रॅक करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. टेल्साचे सीईओ मस्क यांनी स्वत: या तरुणाची दखल घेत त्याच्याकडे त्यांचं खासगी जेट ट्रॅक करणं बंद करण्याचं आवाहन देखील केलं होतं. याववरुन जॅक स्वीनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करत असलेली माहिती खरी असल्याचं समोर आलं होतं.
एलन मस्क यांनी गेल्या महिन्यात १९ वर्षीय जॅक स्वीनी याला ५ हजार डॉलरची ऑफर दिली होती. माझं प्रायव्हेट जेट ट्रॅक करणं बंद केलंस तर ५ हजार डॉलर्सचं बक्षीस देईन, अशी ऑफर एलन मस्क यांनी जॅक स्वीनीला दिली होती. पण ती ऑफर जॅकनं फेटाळून लावली होती. आता याच जॅकनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक शक्तीशाली व्यक्तीमत्वांचे फ्लाइट डिटेल्स ट्रॅक करण्यास सुरुवात केली आहे. यात जॅकनं विशेषत: युक्रेन विरुद्धच्या युद्धात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या रशियाच्या बड्या अधिकाऱ्यांच्या फ्लाइटचे डिटेल्स ट्रॅक करणं सुरू केलं आहे. असा दावा खुद्द जॅक स्वीनी यानंच केला आहे.
ट्विटरवर जॅक स्वीनी यानं एक अकाऊंट सुरू केलं आहे. या हँडलचं नाव PutinJet असं ठेवलं आहे आणि ते २६ फेब्रवारी रोजी सुरू केलं आहे. अवघ्या चारच दिवसात या हँडलचे २२ हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. जॅक स्वीनीच्या दाव्यानुसार या ट्विटर हँडलवर रशियातील डझनभर VIP अधिकाऱ्यांच्या फ्लाइटचे डिटेल्स ट्विट करण्यात येणार आहेत. दरम्यान, देण्यात येणारी माहिती तंतोतंत खरी असेल असा गैरसमज बाळगू नये असंही त्यांनं म्हटलं आहे.
So yeah @PutinJet is live now :), don't expect this to be too accurate though there are a dozen VIP Russian planes, and ADS-B coverage isn't great in Russia.
— Jack Sweeney (@JxckSweeney) February 26, 2022
PutinJet नावाच्या ट्विटर हँडलवर सातत्यानं रशियाच्या कथित VIP फ्लाइट्सचे डिटेल्स ट्विट केले जात आहेत. यात स्क्रिनशॉट्समध्ये फ्लाइट्सची डिटेल्स आणि मॅपचा समावेश आहे. कोणती फ्लाइट कुठून उड्डाण घेणार आणि कुठे लँड करणार याची सविस्तर माहिती यात देण्यात येत आहे. तसंच संबंधित फ्लाइटचं लाइव्ह ट्रॅकिंग देखील केलं जात आहे.