प्रिटोरिया : अनेक घोटाळ््यांनी प्रतिमा कलंकित झालेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी बुधवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशवासियांना उद्देशून टीव्हीवर केलेल्या भाषणात झुमा यांनी पदत्यागाची घोषणा केल्याने आफ्रिका खंडातील या सर्वाधिक विकसित देशातील राजकीय अस्थिरता संपली आहे. यानंतर लगेचच संसदेने सध्या उपराष्ट्राध्यक्ष असलेले सिरिल रामपोसा नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली.सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाने (एएनसी) झुमा यांना पद सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बुधवारी झुमा यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत आपण पदत्याग करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. विरोधी पक्षांनी झुमा यांच्याविरुद्ध संसदेत मांडलेला अविश्वास ठराव गुरुवारी चर्चा व मतदानासाठी येणार होता. झुमा स्वत:हून पदावरून दूर झाले नाहीत तर या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून त्यांची हकालपट्टी करण्याचे संकेत ‘एएनसी’ने दिलेहोते. तसे झाले तर गच्छंती अटळआहे याची जाणीव ठेवून झुमा यांनी बदनाम होऊन पदावरून जाण्यापेक्षा स्वत:हून पायउतार होण्याचा पर्याय निवडला.सन २००९ मध्ये ‘एएनसी’चे प्रमुख या नात्याने झुमा यांनी त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष एन्केबी यांना अशाच पद्धतीने पदत्याग करायला लावून स्वत: राष्ट्राध्यक्षपद पटकविले होते. ७५ वर्षांच्या झुमा यांच्यावर तेच अस्त्र आता उलटले.टीव्हीवरून केलेल्या भाषणात झुमा यांनी पक्षाचा निर्णय अन्यायकारक असला तरी देशाचे हित लक्षात घेऊन आपण पजत्याग करीत, असल्याचा आविर्भाव आणला. ते म्हणाले की,‘एएनसी’ने दिलेल्या वागणुकीने मी खूप व्यथित झालो आहे.पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी असहमत असलो तरी मी पक्षशिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे.दरम्यान, आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, जेकम जुमा यांच्या राजीनाम्यामुळे दक्षिण आफ्रिकेची जनता निश्चिंत होईल. (वृत्तसंस्था)मला अविश्वास ठरावाची भीती वाटत नाही. मी माझ्या क्षमतेनुसार जनतेची खूप सेवा केली आहे. देशात हिंसा होऊ नये, माझ्यामुळे कुणाचा जीव जाऊ नये तसेच पक्षात फूट पडू नये, यासाठी मी तत्काळ प्रभावाने पदाचा राजीनामा देत आहे. पद सोडल्यानंतरही मी जनतेची सेवा करीतच राहीन. - जेकब झुमा
जेकब झुमा यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडले; दक्षिण आफ्रिकेतील अनिश्चितता संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:25 AM