इस्लामाबाद : जैश-ए-महंमद (जेईएम) पाकिस्तानात अस्तित्वातच नाही, असे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी बुधवारी एका मुलाखतीत म्हटले. ते म्हणाले, जैश-ए-महंमदला संयुक्त राष्ट्रांनी तसेच पाकिस्ताननेही बेकायदा घोषित केलेले आहे. आम्ही काहीही कोणाच्याही दबाबाखाली येऊन करीत नाही. पुलवामातील आत्मघाती हल्ला आम्ही घडवला, असा दावा जेईएमने केला होता. त्यावर गफूर म्हणाले की, तो दावा पाकिस्तानातून करण्यात आलेला नव्हता. पाकिस्तानातील बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांचे दावेही खोटे असल्याचे गफूर म्हणाले. जैश-ए-महंमदच्या ४४ सदस्यांना पाकिस्तानने स्थानबद्ध केल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने ही भूमिका घेतली आहे.इस्लामी अतिरेक्यांविरुद्धच्या जोमाने सुरू केलेल्या कारवाईत सरकारने गुरुवारी १८२ धार्मिक शाळांचे नियंत्रण स्वत:कडे घेऊन १०० पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतले. अतिरेकी कारवायांसाठी इस्लामिक कल्याणकारी, अशी नावे असलेल्या संघटनांचा वापर होत असल्याचे अमेरिकेने म्हटले असून, सरकारनेही अशाच संघटनांना कारवाईचे लक्ष्य केले आहे. (वृत्तसंस्था)
जैश-ए-महंमद पाकमध्ये अस्तित्वातच नाही : गफूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 6:06 AM