वॉशिंग्टनः अमेरिकेकडून लादण्यात येणाऱ्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मोठं विधान केलं आहे. S-400 क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा भारताला अधिकार असल्याचं त्यांनी अमेरिकेला उद्देशून सांगितलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांच्याबरोबर सोमवारी झालेल्या बैठकीनंतर जयशंकर म्हणाले, भारत रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी स्वतंत्र आहे. यावर कोणत्याही देशानं ढवळाढवळ करण्याची गरज नाही.रशियाकडून आम्ही काय खरेदी करावं आणि काय नाही, याचा सल्ला दुसऱ्या देशांनी आम्हाला देऊ नये. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान मीडियाच्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत. ते म्हणाले, आम्ही आधीसुद्धा सांगितलं आहे की, आम्हाला जी काही सैन्य उपकरणं खरेदी करायची आहेत. त्यासाठी आमचा अधिकार अबाधित आहे. भारतानं कोणत्या देशाकडून काय खरेदी करावं याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. याची गोष्टी समजून घेणंच हिताचं आहे. भारत-रशियाच्या करारावर अमेरिकेची नाराजीभारतानं 5.2 अब्ज डॉलरच्या पाच S-400 क्षेपणास्त्र प्रणाली यंत्रणा खरेदी करण्यासाठी गेल्या वर्षी सहमती दर्शवली होती. त्याचा पुरवठा करण्याचं काम सुरू आहे. रशियानं युक्रेन आणि सीरियामध्ये केलेली कारवाई आणि अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये केलेल्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी 2017च्या निवडणुकींतर्गत रशियाकडून इतर देशांनी शस्त्रास्त्र खरेदी करण्यास निर्बंध घातले आहे. इराणसंदर्भातही भारत आणि अमेरिकेच्या भूमिकेत मतभेद असल्याचंही अधोरेखित झालं आहे. अमेरिकेनं इराणकडून तेल खरेदी करण्यास इतर देशांना मज्जाव केला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्या भेटीमध्ये संरक्षणाबरोबरच अंतराळ सहकार्यासाठीही महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारांतर्गत भारताला सैबेरियामधील नोवन्होसिबिर्स्क शहराजवळ निरीक्षण केंद्र उभारण्याची परवानगी रशियाने दिली आहे. काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ?एस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूच्या विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचं सामर्थ्य आहे. एस-400ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्यातील जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. ही प्रणाली शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम आहे. ही प्रणाली रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक रूप आहे. अल्माज आंटे या शास्त्रज्ञाने ही प्रणाली विकसित केली होती. तसेच 2007पासून एस 400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम रशियाच्या सेवेत आहे. एकाच वेळी 36 वार करण्याची क्षमता हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.
आम्ही काय खरेदी करायचं हे इतरांनी सांगू नये, S-400वरून मोदी सरकारचा ट्रम्पना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 11:25 AM