लंडन, दि. १० - आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचे 'नोबेल पदक' लिलावातून विकणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांना त्यांचे नोबेल पदक पुन्हा मिळणार आहे.
रशियातील सर्वात मोठे उद्योगपती आणि अर्सेनल फुटबॉल क्लबचे सहमालक अलिशेर उस्मानोव हे वॉटसन यांच्या मदतीला धावून आले आहेत. लिलावात टेलिफोनद्वारे ४.७ मिलियन डॉलरला अर्थात ३० कोटी रुपयांना खरेदी केलेले नोबेल पदक पुन्हा वॉटसन यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय उस्मानोव यांनी घेतला आहे.
अलिशेर उस्मानोव हे रशियामधील गर्भश्रीमंत म्हणून सर्वांना परीचीत आहेत. उस्मानोव यांच्याकडे जवळपास १२ बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. जेम्स वॉटसन यांचे नोबेल पदक उस्मानोव यांनी टेलिफोनद्वारे ३० कोटींना खरेदी केले होते. परंतू आता हे नोबेल पदक वॉटसन यांना देणगी म्हणून देण्याचा निर्णय उस्मानोव यांनी घेतला आहे. नोबेल पदकांचे मानकरी हे वॉटसन हेच असून त्यांच्याकडेच हे पदक शोभून दिसेल असे अलिशेर उस्मानोव यांनी म्हटले आहे. जीवशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांना १९६३ साली अनुवांषिक बांधनीसाठी (डीएनए )संशोधनात महत्वपूर्ण योगदान बजावल्याने नोबेल पदक देवून गौरविण्यात आले होते.
वॉटसन हे सध्या ८६ वर्षाचे असून त्यांच्या अॅकेडमिकच्या कर्मचा-यांचा पगार, धर्मादाय संस्थांना देणगी तसेच शैक्षणिक संस्थाच्या देणगीसाठी वॉटसन यांनी नोबेल पदक विक्रीस काढले. त्यांच्या या निर्णयावर विश्वास बसत नाही पण खरोखरच वॉटसन हे ग्रेट शास्त्रज्ञ आहेत. नोबेलसाठी देण्यात येणारा पैसा हा विज्ञानांच्या संशोधनासाठी खर्च करण्यात येणार असल्याने ते माझ्यासाठी अधिक महत्वाचे असल्याचे उस्मानोव यांनी म्हटंले आहे. दरम्यान, जीवशास्त्रात दिलेल्या योगदानाबद्दल १९६२ साली मेडीसनचा नोबेल पुरस्कार फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॉटसन आणि मॉरिज विल्किन्स या तीन जणांना संयुक्तपणे देण्यात आला होता. मागील आठवडयात न्यूयॉर्कमधील क्रिस्टीज लिलावामध्ये नोबेल पदकाची तसेच वॉटसन यांच्या अन्य दोन हस्तलिखित दस्तावेजाची विक्री करण्यात आली होती.