रियाद - सौदी अरेबियानं काश्मीरच्या मुद्द्यांवरून पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय विषय आहे. इतकेच नाही तर हा विषय भारत आणि पाकिस्तानला चर्चेतून सोडवावा लागेल असं क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान अल सऊद यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ रियाज दौऱ्यावर आलेले असताना सौदी अरेबियाच्या प्रिंसनं ही भूमिका स्पष्ट केली आहे.
पाकिस्तान आतापर्यंत काश्मीर मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्र संघात आवाज उचलत होता. परंतु भारत सुरुवातीपासून हा विषय द्विपक्षीय असल्याचं सांगत होता. दहशतवादाबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील काही वर्षापासून राजकीय संबंध दुरावले आहेत. यातच सौदी अरेबियानं शांतता आणि स्थिरतेसाठी दोन्ही देशांनी बहुचर्चित विशेषत: जम्मू काश्मीर वादावर चर्चेतून तोडगा काढण्यावर भर दिला. क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमा आणि शहबाज शरीफ यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सौदी अरेबियानं त्यांची भूमिका सांगितली.
याआधी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री यांनी भारतातील जम्मू काश्मीरमधील मुस्लीम लोकसंख्येचं समर्थन करत या भागातील सुरक्षा आणि स्थिरता मोठं आव्हान असल्याचं म्हटलं होते. जर हा मुद्दा सोडवला गेला नाही तर संपूर्ण भागात अस्थिरता पसरेल. इस्लामची ओळख आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सौदी अरेबिया जम्मू काश्मीरातील मुस्लीमांचे समर्थन करते असं त्यांनी म्हटलं होते. सौदी अरेबियाच्या या विधानामुळे अनेक चर्चा झाल्या. सौदी अरेबियानं भारताचा विश्वासघात केला असं बोलले गेले. मात्र आता खुद्द सौदी अरेबियाच्या प्रिंसनं पाकिस्तानच्या पंतप्रधानासमोर हे विधान करत जम्मू काश्मीर प्रकरणात भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेतून मार्ग निघेल ती द्विपक्षीय चर्चा आहे असं स्पष्ट केले आहे.