नवी दिल्ली/इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तानने बुधवारी (7 ऑगस्ट) भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय, भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. म्हणजेच, राजकीय संबंधांचा दर्जा कमी केला आहे. यानंतर आता पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या सिव्हिल अॅव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये परदेशी विमानांच्या उड्डाणांची उंचीही वाढविण्यात आली आहे. यासोबतच आपल्या विमानांच्या मार्गातही बदल केला आहे. लाहोर भागात परदेशी विमानांना 46 हजार फुटांपेक्षा कमी उंचीवरून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधून उडणाऱ्या विमानांना पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली होती. त्यानंतर 16 जुलै भारतीय विमानांसाठी ती खुली करण्यात आली होती. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलविली होती. या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये भारतासोबत मुत्सद्दी संबंध डाऊनग्रेड केले जातील. याशिवाय, भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापार संबंध तोडण्यात येतील. तसेच, बैठकीत भारतासोबत द्विपक्षीय संबंध व व्यवस्थांचा (समझौता) आढावा घेतला जाईल आणि हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडला जाईल. याशिवाय, 5 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस 'काळा दिवस' म्हणून पाकिस्तान साजरा करेल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 रद्द झाल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सहन झालेले नाही. केंद्र सरकारने या राज्याचा विशेष दर्जा रद्द करत विभाजनही केले आहे. यामुळे धक्का बसलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मंगळवारी विशेष सत्र बोलावले होते. यावेळी इम्रान खान यांनी चुकीच्या शब्दांचा प्रयोग केला आहे.
पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला. तसेच हा मुद्दा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या वेळी त्यांची जीभ घसरली. भारताच्या या पावलामुळे काश्मीरमधील हालत आणखी गंभीर होईल. त्यांनी यापुढे जात भारताने पुलवामासारख्या हल्ल्याला आमंत्रण दिल्याचे म्हटले आहे. तर, इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी युद्धाची भाषा केली आहे. फवाद चौधरी म्हणाले, 'संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार राहायला हवे.'