नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भारतानेपाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या व्हर्चुअल बैठकीत भारताने पाकिस्तावर दहशतवाद्यांना पोसत असल्याचा आरोप केला. त्याचसोबत ओसामा बिन लादेनला शहीद म्हणणाऱ्या पंतप्रधान इमरान खान यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडलं. भारताचं नेतृत्व करणारे परराष्ट्र खात्याचे सचिव महावीर सिंघवी यांनी या बैठकीत पाकिस्तानला विविध मुद्द्यावरुन घेरलं.
या बैठकीत महावीर सिंघवी म्हणाले की, जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढाई करण्यासाठी एकत्र येत होतं. तेव्हा पाकिस्तान एका राज्याच्या सीमेवर दहशतवादी मनसुबे आखत होतं. मुंबई, पठानकोट, उरी, पुलवामा याठिकाणी दहशतवादी हल्ले करणारा देश आता जगाला उपदेशाचे डोस पाजत आहे हे दुर्दैवी आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना कशाप्रकारे थारा देत आहे याची कबुली त्यांच्याच पंतप्रधानांनी दिली आहे. ज्यात त्यांच्या देशात ४० हजाराहून जास्त दहशतवादी असल्याची कबुली दिली आहे असं ते म्हणाले.
तसेच काऊंटर टेररिज्ममध्ये सिंघवी यांनी पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि राहील अशा शब्दात पाकला सुनावलं आहे. याठिकाणी पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या पाहिजेत. जे पाकिस्तान दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच वास्तव सीमेवरील दहशतवाद आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेला दहशतवाद असतानाही काश्मिरी लोकांनी भारताच्या लोकशाहीवर विश्वास कायम ठेवला आहे. भारताने नेहमीच वारंवार सांगितलंही आहे.
याशिवाय भारतासह संपूर्ण जगात मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्यात येत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका आणि योग्य पाऊलं उचलली जात आहेत. मात्र आजही पाकिस्ताने दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात ठेवलं आहे असा घणाघात परराष्ट्र खात्याचे सचिव महावीर सिंघवी यांनी या बैठकीत केला.
दरम्यान, पाकिस्तानच्या तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तान सरकारने आता असा अजब दावा केला आहे. तसेच कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, असा दावा पाक सरकारने केला आहे. तसेच जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अॅक्सेस देण्याची ऑफर देण्यात आल्याचा देखील पाकिस्तानचा दावा आहे. जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे माहिती आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे.