इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याविरोधात पाकिस्तान जंग जंग पछाडत आहे. भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिका, रशिय़ा, चीनसारख्या देशांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चीनव्य़तिरिक्त अन्य देशांनी त्यांच्याकडे लक्षच न दिल्याने इम्रान यांनी थेट आरएसएसवरच आरोप केले आहेत.
गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कलम 370 बदलण्याचा आणि जम्मू काश्मीर-लडाख विभाजन, केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव राज्यसभा आणि लोकसभेत मांडला होता. हा प्रस्ताव बहुमताने मंजुरही करण्यात आला होता. यामुळे काँग्रेसमध्येही दोन मतप्रवाह उघड झाले होते. काँग्रेसच्या एका राज्यसभेच्या खासदाराने पक्षाच्या भुमिकेवर नाराज होत राजीनामाही दिला होता.
या नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानने विरोध नोंदवत भारताशी व्यापार बंद केला होता. तसेच भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांना माघारी पाठविले होते. यावरच न थांबता इम्रान खान यांनी भारताने पुलवामा सारख्या हल्ल्याला निमंत्रण दिल्याची धमकीही दिली होती. तसेच इम्रान खानने अमेरिका, रशिया आणि चीन यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले होते. मात्र, चीनने विरोध नोंदवत हस्तक्षेपास नकार दिला होता. तर अमेरिका आणि रशियाने हात आखडते घेतले आहेत. यामुळे त्यांच्याकडून निराशा पदरी पडल्याने इम्रान खान यांनी आरएसएसवर ट्विटरद्वारे टीका केली आहे.
आरएसएसच्या नाझी विचारसरणीच्या प्रभावाखाली आल्याने काश्मीरमध्ये जमावबंदीची स्थिती आहे, असे ट्विट इम्रान खान याने केले आहे. यावर भाजपाकडून राम माधव यांनी प्रत्यूत्तर देताना आम्ही जिन्नांच्या दोन देश आणि शेख अब्दुल्लांच्या तीन देशांच्या सिद्धांताला संपविले आहे. इम्रान खान यांनी भारतामध्ये लक्ष घालण्यापेक्षा पाकिस्तानातील धार्मिक अतिवादाला संपवून दाखवावा, असे आव्हान दिले आहे.
इम्रान खानने काश्मीरचा ढाचाच बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तसेच जगभरातील देशांना यामध्ये लक्ष घालण्याचे आवाहन त्याने केले. हिटलरने केलेल्या नरसंहारावेळी जसे आंतरराष्ट्रीय समूहाने तोंड बंद ठेवले होते, तसेच भारतावेळी शांत राहणार का, असा प्रश्नही त्याने जगभरातील देशांना केला आहे.