नवी दिल्ली: भूकंप होऊन २४ तासही उलटले नसताना जपानमध्ये आज आणखी एक मोठी दुर्घटना घडली. टोकियोच्या हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर दोन विमानांची टक्कर होऊन जपान एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाला भीषण आग लागली. यावेळी प्रवासी विमान आगीच्या गोळ्याप्रमाणे धावपट्टीवर धावत राहिले. विमानात ३७९ प्रवासी होते, त्यांनी जळत्या विमानातून उडी मारून आपला जीव वाचवला आणि सर्व प्रवासी वेळेत सुखरूप बाहेर आले.
जपान तटरक्षक दलाच्या विमानाने प्रवासी विमानाला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांमध्ये केला जात आहे. सध्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून एवढी मोठी चूक कशी झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, मृत्यू झालेल्या तटरक्षक दलातील सदस्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी संबंधित यंत्रणांना या अपघाताची चौकशी करून सर्व माहिती लोकांना देण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, जपानमध्ये नवीन वर्षात आलेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत जवळपास ५० जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात सुमारे १५५ भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक धक्के ६ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे होते, तर पहिला हादरा ७.६ रिश्टर स्केलचा होता. या धक्क्यानेच सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने हजारो घरांमध्ये वीज नाही. परिस्थिती इतकी बिकट आहे की जपानी सैन्याला मैदानात उतरावे लागले. भूकंपग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी विमानांचा वापर केला जात आहे.