टोकियो- चीन, जपान आणि द. कोरिया या पूर्व आशियातील देशांचे नेते जपानची राजधानी टोकियोमध्ये चर्चेसाठी एकत्र आले आहेत. द. कोरिया आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष भेटल्यानंतर उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्रे नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच गेली सहा दशके चालू असलेले शीतयुद्ध संपुष्टात आले. आता जपान, चीन आणि द. कोरियाने चर्चापरिषद घेतल्यामुळे आणखी सकारात्मक बदल होतील असे वाटते. 2015 मध्ये सेऊलमध्ये अशीच परिषद झाली होती. जपानचे पंतप्रधान शिजो अबे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि चीनचे पंतप्रधान ली केकीयांग यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चाही करणार आहेत. 2010 नंतर जपानला जाणारे केकीयांग हे पहिले पंतप्रधान आहेत.उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे मून यांची भेट झाल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची भेट होणार आहे. या भेटीच्या नियोजनासाठी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पेओ उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगला गेले आहेत. कोरियम द्वीपकल्पात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अमेरिका बांधील आहे असे मत पोम्पेओ यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्याभेटीमुळे उत्तर कोरियाच्या ताब्यात असणाऱ्या अमेरिकन नागरिकांची सूटका होईल अशी अमेरिकन सरकारला अपेक्षा आहे.
जपान, चीन, द. कोरियाच्या नेत्यांची टोकियोत भेट, पूर्व आशियाच्या शांततेसाठी नवे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 1:25 PM