ऑनलाइन लोकमत -
टोकियो, दि. १५ - जपानमधील दक्षिण आणि उत्तर भागात भुकंपाच्या धक्क्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून हजाराहून जास्त लोक जखमी झाले आहेत. भुकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल होती. भुकंपामुळे अनेक घरांचं नुकसान झालं असून अनेक भागांत वीजदेखील गायब झाली आहे. या भागात असलेल्या न्युक्लिअर प्लांटची कोणतीच हानी झालेली नाही.
गुरुवारी रात्री 9.30 वाजता भुकंपाचा पहिला धक्का जाणवला. 44 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. शाळा तसंच कम्युनिटी सेंटर्समध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस, अग्निशमन दल आणि बचावकार्य पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.
एकूण 3000 जवान बचावकार्य करत आहेत. गरज लागल्यास अजून मदत पाठवण्यात येईल अशी माहिती पंतप्रधान शिंझो एब यांनी दिली आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करु असंही पंतप्रधान शिंझो एब बोलले आहेत.
भुकंपाचा आकार 11 मार्च 2011मध्ये आलेल्या भुंकपापेक्षा कमी असला तरी त्याची तीव्रता मात्र सारखीच होती. 11 मार्च 2011मध्ये आलेल्या भुकंपात तब्बल 20 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्सुनामी न आल्याने तसंच मजबूत इमारतींमुळे या भुकंपात जास्त नुकसान झालं नाही.