नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार झाला आहे. स्थानिक माध्यमांनी यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. या घटनेमुळे जपानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली असून अबे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
माजी पंतप्रधान शिंजो अबे जपानच्या नारा शहरात एका कार्यक्रमात संबोधित करत असताना अचानक जागीच कोसळले. प्राथमिक माहितीनुसार शिंजो अबे भाषण करत असताना जखमी होऊन खाली कोसळले. यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचं घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं म्हटलं आहे. तसंच शिंजो अबे खाली कोसळल्यानंतर रक्तस्त्राव होत असल्याचंही दिसून आलं असंही स्थानिक पत्रकारानं म्हटलं आहे. शिंजो अबे भाषण करत असताना त्यांच्यावर मागून दोन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जपानच्या एनएचके वर्ल्ड न्यूजनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
शिंजो अबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले पहिलेच पंतप्रधान आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध वृद्धिगंत करण्यास शिंजो अबे यांचा मोठा वाटा आहे. तसेच, २०१७ मध्ये जपानचे पंतप्रधान असताना शिंजो अबे हे भारतात आले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. शिंजो अबे यांची गळाभेट घेत नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले होते.
याचबरोबर, २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी जपानच्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंजो अबे यांनी नरेंद्र मोदी हे सर्वात विश्वासू मित्र असल्याचे मत व्यक्त केले होते. "मोदी अत्यंत विश्वासू मित्र आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारत जगात एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे. त्यांचे जपानमध्ये स्वागत करणे, हे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे', असे शिंजो अबे यांनी म्हटले होते.
प्रकृती अस्वस्थामुळे दिलेला राजीनामाशिंजो अबे यांनी प्रकृती अस्वास्थामुळे २०२० साली जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी उपचाराअभावी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळता येणार नसल्यामुळे शिंजो अबे यांनी जनतेची माफी मागत राजीनाम्याची घोषणा केली होती. शिंजो अबे यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढणारे ट्विट केले होते. त्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे शब्द काळजाला भिडले असल्याचे सांगत भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी वृद्धिगंत होतील, असा विश्वासही शिंजो अबे यांनी व्यक्त केला होता. भारतानं शिंजो अबे यांचा पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित देखील केलेलं आहे.