Japan Moderna Vaccine Contamination: जपानमध्ये कोरोना लसीकरण मोहिमेत एक मोठं संकट निर्माण झालं आहे. मॉडर्ना कंपनीच्या लसीत दूषित पदार्थ आढळून आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे लसीकरण मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. जवळपास १५ दिवसांपूर्वी मॉडर्ना लसीत दूषित पदार्थ आढळल्याची पहिली घटना समोर आली आहे. त्यानंतर मॉर्डन लसीचा स्टॉक न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार रविवारी देखील मॉडर्ना लसीमध्ये दूषित पदार्थ आढळून आल्याची तक्रार समोर आली आहे. या बातमीनंतर जपानमध्ये आतापर्यंत जवळपास १० लाख अतिरिक्त लसींचा वापर करणं रद्द करण्यात आलं आहे.
१६ ऑगस्ट रोजी जपानमध्ये मॉडर्ना लसीमध्ये दूषित पदार्थ आढळण्याचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. मॉडर्ना लसीचे जपानमधले स्थानिक वितरक टेकेडा फार्मास्युटिकल्सनं याबाबत पुष्टी दिली होती. यानंतर एकूण लसीच्या ३९ कुप्यांमध्ये दूषित पदार्थ आढळून आला होता. ५ लाख ७० हजार डोसेसचा पहिला स्टॉक बाहेर आल्यानंतर याच स्टॉकमध्ये एकूण ३९ कुप्यांमध्ये दूषित पदार्थ आढळून आले होता. तर २६ ऑगस्ट रोजी जपान सरकारनं देशात ८६३ लसीकरण केंद्रांवर पाठविलेल्या एकूण १.६३ मिलियन मॉडर्ना लसीच्या डोसेसचा वापर करण्यात येणार नाही असं जाहीर केलं होतं. यानंतरही जपान सरकारसमोरील अडचणी काही थांबताना दिसत नाहीत. जपानच्या ओकिनावाच्या लसीकरण केंद्रावरही अशाच प्रकारची दूषित लस आढळल्याची माहिती समोर आली.
ओकिनावा येथे लसीची कुपी आणि सुई या दोन्हीमध्ये काळ्या रंगाचा दूषित पदार्थ आढळून आला आहे. तर एका सुईत गुलाबी रंगाचा दूषित पदार्थ आढळून आला आहे. त्यामुळे जपानमध्ये वितरीत करण्यात आलेला लसीचा चौथा स्टॉक देखील संशयाच्या भोवऱ्यात आला आहे.
लसीच्या कुपीत आढळून येणारा दूषित पदार्थ नेमका काय आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जपानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लसीत आढळलेला दूषित पदार्थ एक धातूचा कण असल्याचं बोललं जात आहे. सध्या या दूषित पदार्थाचं परिक्षण केलं जात असून लवकरच याबाबतची अधिकृत माहिती समोर येईल असंही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, लसीत अशा पद्धतीनं दूषित पदार्थ आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर जपान सरकारनं चिंता करण्याचं कोणतच कारण नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण मॉडर्ना लसीचा दुसरा डोस घेतलेल्यापैंकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यातही या दोघांनाही दूषित लस आढळल्यामुळे सस्पेंड करण्यात आलेल्या स्टॉकमधीलच लस दिल्याचंही उघड झालं आहे.