जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी आहे. भाषणादरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर पाईप बॉम्ब फेकल्याची माहिती आहे. मात्र, बॉम्बचा स्फोट होईपर्यंत पंतप्रधान फुमियो किशिदा यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ज्या ठिकाणी भाषण होणार होते तेथून किशिदा यांना घेऊन जात असतानाच मोठा आवाज झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकायामा शहरात लोकांना संबोधित करताना त्यांच्याजवळ एक पाईप सारखी वस्तू फेकण्यात आली. ही वस्तू पाईप किंवा स्मोक बॉम्ब असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेबाबचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने जपानी मीडियाच्या हवाल्याने दिले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेले लोक घटनेनंतर इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे.
या घटनेत पंतप्रधानांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. ते आपल्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमात बोलण्यासाठी आले होते. दरम्यान, गेल्या वर्षी प्रचारादरम्यान माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची एका हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली होती. भाषणादरम्यान शिंजो आबे यांना दोन वेळा गोळ्या लागल्या, त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली. या हल्ल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.