टोकियो - जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा (Yoshihide Suga) यांनी बुधवारी देशवासीयांची माफी मागितली आहे. आपल्या पक्षातील काही खासदार नाईट क्लबमध्ये गेल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागितली आहे. जपानमधील सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे अशातच सत्ताधारी पक्षातील काही खासदार हे सोमवारी एका नाईट क्लबमध्ये दिसून आले. त्यानंतर थेट पंतप्रधानांनाच या खासदारांच्या वतीने संपूर्ण देशाची माफी मागावी लागल्याची घटना समोर आली आहे.
पंतप्रधान सुगा यांच्या सरकारवर कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये अपयशी होत असल्याचा आरोप केला जात आहे. सातत्याने टीका करून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. कोरोना रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि निर्णय अपुरे असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. असं असतानाच खासदारांनीच नियमांचे उल्लंघन करुन नाईट क्लबमध्ये हजेरी लावल्याने जपान सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. जोरदार टीका केली जात आहे. योशिहिदे सुगा यांनी "लोकांनी रात्री आठनंतर घराबाहेर पडू नये, बाहेरच्या गोष्टी खाणं टाळावं आणि गरज नसेल तर उगाच बाहेर फिरू नये असं आम्ही लोकांना सांगत आहोत."
"लोकांना हे सांगत असतानाच आमच्या खासदारांनीच याचं उल्लंघन केल्याबद्दल मी खूप निराश आणि दु:खी झालो आहे. जनतेचा आपल्यावरील विश्वास वाढेल अशापद्धतीचं आचरण प्रत्येक खासदाराचं असावं" असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी या प्रकाराबद्दल देशाची माफी मागितली आहे. जपानने या महिन्यामध्ये टोकीयो आणि इतर शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एमर्जेंसी घोषित केली आहे. सरकारने रेस्टॉरंट आणि बार मालकांना रात्री आठ नंतर व्यवसाय बंद करावा असा आदेश दिला आहे.
सरकारने या आदेशांनुसार कठोर दंड वसुली करण्यास सुरुवात केलेली नसल्याने अनेक ठिकाणी या सूचनांचे उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ खासदारांपैकी एक असणाऱ्या जुन मत्सूमोटो यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना धैर्य ठेवण्याचं आवाहन करतो तेव्हा मी स्वत: अशाप्रकारे बेजबाबदारपणे वागणं खूप चुकीचं आहे". मत्सूमोटो यांनीच प्रसारमाध्यमांशी आपण सोमवारी एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये डिनर केल्यानंतर टोकीयोमधील दोन नाईट क्लबमध्ये गेल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.