टोक्यो : कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (Coronavirus Omicron Variant) वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर जपानने बुधवारी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस (Covid-19 Booster Dose) देण्यास सुरुवात केली आहे. जपानमध्येओमायक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहेत. जपानमध्ये सुरुवातीची लसीकरण मोहीम फेब्रुवारीच्या मध्यात सुरू झाली होती.
ज्या आरोग्य कर्मचार्यांना नऊ महिन्यांपूर्वी लसीचा डोस देण्यात आला होता, ते आता संसर्गाच्या संभाव्य पुढील लाटेपूर्वी अतिरिक्त संरक्षण मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. विशेषतः ओमायक्रॉन व्हेरिएंट समोर आल्यानंतर याची भीती वाढली आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट पहिल्यांदा आढळला होता. यानंतर मंगळवारी जपानमध्येही ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण असल्याचे समोर आले.
जपानच्या आधी यूकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता बूस्टर लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. भारतातही कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट पाहता लसीच्या बूस्टर डोससाठी एक धोरण तयार (Booster Dose Policy of India) करण्यात येत आहे. येत्या 2-3 आठवड्यांत बूस्टर डोसबाबत रणनीती तयार केली जाईल. यापूर्वी, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एनके अरोरा (Dr. NK Arora) म्हणाले होते की, कोरोना लसीचा अतिरिक्त आणि बूस्टर डोस देण्याबाबत 15 दिवसांच्या आत सर्वसमावेशक धोरण येऊ शकते.
दरम्यान, भारतातील डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, लोकांना बूस्टर शॉट देणे सुरू केले पाहिजे. प्रतिकारशक्ती कमी झालेल्या लोकांना बूस्टर डोस दिला जातो, तर निरोगी लोकांना दुसरा डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनी बूस्टर शॉट (Booster Shot) दिला जातो. कर्करोग किंवा अवयव प्रत्यारोपणासारख्या रोगांमुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती खराब झाली आहे त्यांना निर्धारित दोन-डोस लसीकरण कार्यक्रमापासून संरक्षित केले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, निरोगी लोकांपूर्वी अशा लोकांना तिसरा डोस देणे महत्वाचे आहे.
टोक्यो मेडिकल सेंटरमध्ये, परिचारिका आणि डॉक्टरांच्या एका गटाला बूस्टर डोस देण्यात आला आहे. रुग्णालयाचे प्रमुख काझुहिरो अराकी म्हणाले की, आमच्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षिततेच्या भावनेने उपचार करण्यासाठी ही एक महत्त्वाची पहिली पायरी आहे. बूस्टर डोस महत्वाचे आहेत, कारण लस डेल्टासह इतर व्हेरिएंटच्या व्हायरसविरोधात प्रभावी आहेत.