जपानची ट्रेन सिस्टम ही आपल्या अचूक वेळेसाठी जगभरात खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ट्रेन लेट होणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. एक मिनिट जरी ट्रेनला उशीर झाला तर तिथे तो चर्चेचा विषय ठरतो. अशातच आता आणखी एक घटना घडली आहे. एक मिनिट उशीर झाला म्हणून बॉसने पगार कापल्याची घटना घडली. पगारातून 56 पाउंड म्हणजेत जवळपास 5 हजार रुपये कापण्याचा आदेश देण्यात आला आहे. यानंतर आता ट्रेनचा ड्रायव्हर चांगलाच संतापला असून त्याने कोर्टात धाव घेतली आहे. तसेच 14,300 पाउंड म्हणजेच 14 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ड्रायव्हर गेल्या वर्षी 18 जून रोजी ओकायामा या स्टेशनवर एक रिकामी ट्रेन घेऊन जाण्यासाठी आला होता. मात्र त्याचवेळी अचानक त्याच्या पोटात दुखू लागलं आणि तो बाथरुममध्ये गेला. त्याच दरम्यान त्याने आपल्या एका ज्युनिअर ड्रायव्हरला आपलं काम करण्यास सांगितलं. त्यामुळे ती ट्रेन चुकीच्या प्लॅटफॉर्मवर गेली. त्याचमुळे ट्रेनला एक मिनिट उशीर झाला. या कारणामुळे जपानच्या रेल्वे कंपनीने कर्मचाऱ्याच्या पगारामधील 5600 रुपये कापून घेतले.
कापलेल्या पगारासाठी नुकसान भरपाईची मागणी
कंपनीच्या या निर्णयाविरोधात ड्रायव्हर ओकायामा लेबर स्टँडर्ड इन्स्पेक्शन ऑफिस येथे पोहोचला. तिथे कंपनीने त्याचा पगार कमी कापला. पण कर्मचारी हे ऐकण्यास तयार नव्हता. त्याला पगार कापणंच मान्य नव्हतं. त्यामुळे त्याने याला नकार दिला. त्याने पुढे ओकायामाच्या जिल्हा न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. तसेच एक मिनिटाचा उशीर झाला म्हणून कापलेल्या पगाराबाबत त्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. आपलं काम, कापलेला पगार, मानसिक त्रास, नोकरी अशा गोष्टींचा उल्लेख करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
एका छोट्याशा चुकीची मोठी शिक्षा
कंपनीकडे कर्मचाऱ्याने तब्बल 14 लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. कंपनीने पगार कापला त्याबाबत 'काम नाही तर वेतन नाही' या सिद्धांताचा दाखला दिला आहे. याउलट ड्रायव्हरने कंपनीवरच काही आरोप केले आहेत. तसेच एका छोट्याशा चुकीची मोठी शिक्षा दिली आहे. खरं तर याला नियमांचं उल्लंघन म्हटलं जात नाही असं म्हटलं आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. जपानमधील अनेक लोकांनी ड्रायव्हरची बाजू योग्य असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.