टोकियो: दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिका आणि जपाननं नवी रणनीती आखली आहे. अमेरिका, जपाननं चीनला रोखण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीलादेखील आमंत्रित केलं आहे. तर दुसरीकडे चीननं वेगानं आपल्या लष्कराचं आधुनिकीकरण सुरू केलं आहे. जमिनीपाठोपाठ पाण्यातही चीननं अतिशय आक्रमकपणे हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे इतर देश सतर्क झाले आहेत.२०२१ मध्ये युरोपातल्या मोठ्या देशांनी आपल्या सामरिक रणनीतीत इंडो पॅसिफिक क्षेत्राला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच पुढील काही महिने ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका एलिजाबेथ आणि तिचा स्ट्राईक ग्रुप पूर्व आशियात तैनात असणार आहे. तर फ्रान्स आपली एक युद्धनौका जपानकडे पाठवणार आहे. यासोबतच जर्मनीदेखील एक विनाशिका जपानी नौदलाकडे पाठवणार आहे.चीनला लगाम घालण्यासाठी अमेरिका आणि जपान युरोपीय देशांची मदत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी त्यांचे जर्मन समकक्ष एनेग्रेट क्रॅम्प-कर्रेनबॉयर यांच्याशी १५ डिसेंबरला ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. युरोपसोबत संरक्षण सहकार्य करण्याची क्षमता जपानमध्ये असल्याचं यावेळी किशी म्हणाले. त्यावर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात घडणाऱ्या घटनांचा परिणाम जर्मनी आणि युरोपवरदेखील होतो, अशी प्रतिक्रिया एनेग्रेट क्रॅम्प-कर्रेनबॉयर यांनी दिली. दक्षिण चिनी समुद्र आणि पूर्व चिनी समुद्रात चीननं आपल्या हालीचाली वाढवल्या आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलं आहे. दोन्ही समुद्रांमध्ये असलेल्या निर्जन बेटांवर चीननं सैनिकी तळ उभारले आहेत. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे अनेक देश नाराज आहेत. त्यामुळेच सध्या चीनचे जपान, ब्रुनेई, मलेशिया, फिलिपीन्स, तैवान आणि व्हिएतनाम यांच्यासह अनेक देशांसोबत वाद सुरू आहेत.
चीनविरोधात 'पाच का पंच'; ड्रॅगनची कोंडी करण्यासाठी पाच बड्या देशांची आघाडी
By कुणाल गवाणकर | Published: January 07, 2021 6:20 PM