टोकियो : जपानी लष्कराला विदेशी भूमीवर लढण्याची मुभा देणारे विधेयक देशाच्या संसदेने रविवारी मंजूर केले. यामुळे देशाच्या लष्करासह जपानच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूमिकेचीही व्याप्ती वाढणार आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने राज्यघटनेत बदल करून विदेशी भूमीवरील संघर्षातून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते.जपान सरकारने आपल्या लष्कराला विदेशी भूमीवर लढता यावे यासाठी संसदेत विधेयक मंजूर करून घेतले. घटनेत बदल केला जाऊ नये यासाठी विरोधकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे नव्या कायद्यावरील मतदानाला विलंब झाला. दुसरीकडे युद्धविरोधी नागरिक संसदेबाहेर जोरदार निदर्शने करून याला विरोध करत होते. विदेशी भूमीवर न लढण्याच्या राज्यघटनेतील शांतताप्रिय तरतुदीला अनेक जपानी नागरिकांचा पाठिंबा आहे. कनिष्ठ सभागृहात हे विधेयक यापूर्वीच मंजूर झाले आहे. चीनच्या वाढत्या प्राबल्याने देशासमोर नवी लष्करी आव्हाने उभी ठाकली असून त्यांना सामोरे जाण्यासाठी संरक्षण धोरणात बदल घडवून आणणे अगत्याचे आहे, अशी भूमिका सरकारने मांडली. संसदेत प्रस्तावाच्या बाजूने १४८, तर विरोधात ९० मते पडली. या प्रस्तावावर २०० हून अधिक तास चर्चा झाली. पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी धोरणाचा एक भाग म्हणून या विधेयकाकडे पाहिले जाते. (वृत्तसंस्था)तेव्हा काय...अणुबॉम्बच्या हल्ल्याने होरपळलेल्या जपानने दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या घटनेत काही बदल केले. स्वसंरक्षणाचा विषय वगळता इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय वादात लष्करी बळाचा वापर करण्यास मनाई, हा यातील प्रमुख बदल होता. आता काय...विधेयक मंजूर झाल्यामुळे जपानी लष्कराचा विदेशी भूमीवर लढा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जपान किंवा त्याच्या अत्यंत जवळच्या देशावर हल्ला झाल्यास व त्याची परिणती जपानच्या अस्तित्वाला धोका पोहोचविणारी असल्यास जपानी लष्कर लढाईत सहभागी होईल. याशिवाय जपानचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी व जपानी नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याच्या स्थितीत जपानी लष्कर विदेशी भूमीवर जाऊन युद्ध करू शकते.
जपानी लष्कराला विदेशी भूमीवर लढण्याची मुभा
By admin | Published: September 19, 2015 10:04 PM