ठळक मुद्देदहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कठोर पावलं उचला अशा शब्दांत जपानने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी 14 फेब्रवारीला भारतात झालेल्या पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. भारत आणि पाकिस्तानने चर्चेतून प्रश्न सोडवून परिस्थिती नियंत्रणात आणावी असं म्हटलं आहे.
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कठोर पावलं उचला अशा शब्दांत जपाननेपाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी 14 फेब्रवारीला भारतात झालेल्या पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. तसेच भारत आणि पाकिस्तानने चर्चेतून प्रश्न सोडवून परिस्थिती नियंत्रणात आणावी असं म्हटलं आहे.
जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी ‘काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडत असून आपल्याला चिंता आहे. 14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने जबाबदारी घेतलेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. दहशतवादाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे’ म्हटलं आहे.
‘भारतीय आणि पाकिस्तानी हवाई दल यांच्यात 26 फेब्रुवारीपासून तणावपूर्ण स्थिती असून भारत आणि पाकिस्तानने कारवाई थांबत चर्चेतून प्रश्न सोडवणं गरजेचं आहे’ असंही टारो कोनो यांनी सांगितलं. भारताने राजनैतिक 'स्ट्राइक' करण्याचं 'मिशन' हाती घेतलं आहे आणि त्याचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल करताहेत. पाकिस्तानने आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत, अशी रोखठोक भूमिका अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी बुधवारी घेतली होती. त्यानंतर, रात्री उशिरा अजित डोवाल यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचं कळतं. अमेरिका भारताच्या बाजूने ठामपणे उभी राहणं, हे पाकिस्तानला झेपणारं नाही. त्यामुळे हेच ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न भारत करताना दिसतोय.
भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईला अनेक मोठ्या देशांनी पाठिंबा दिला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा, असा प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दिला आहे. त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आलीय. हे भारतासाठी मोठं यश आहे आणि पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा. वास्तविक, या बड्या देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. परंतु, अमेरिकेसह रशिया, जपान, इस्रायल, ऑस्ट्रेलिया यासारखे बलाढ्य देशांनी भारताला जाहीर पाठिंबा दिला आहे. माइक पॉम्पियो यांनी काल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी चर्चा केली होती. लष्करी कारवाईचा विचार बाजूला ठेवून तणाव कमी करण्यास प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी पाकला केली होती. तसंच, दहशतवाद्यांच्या तळांवर कठोर कारवाई करण्यासही सांगितलं होतं. त्यांनी ही भूमिका आंतरराष्ट्रीय समूहापुढे - संयुक्त राष्ट्रांमध्येही मांडावी, ही भारताची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने पावलंही पडताना दिसत आहेत.