टोकियो: जपानचे शास्त्रज्ञ अंतराळात लिफ्ट वापरण्याच्या प्रयत्नात आहे. हा प्रयोग याच महिन्यात केला जाऊ शकतो. शिंजोका विद्यापीठाचा संशोधन विभागाकडून सध्या यावर काम सुरू आहे. विद्यापीठाच्या टीमकडून सध्या या प्रयोगासाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती सुरू आहे. जपानची अंतराळ संशोधन संस्था तानेंगशिमा पुढील आठवड्यात यासाठी एच-2बी रॉकेटचं प्रक्षेपण करु शकते. लवकरच जपानकडून अवकाशात लिफ्ट (स्पेस एलिवेटर) वापरण्याचा प्रयोग केला जाईल. यासाठी एक बॉक्स वापरण्यात येईल. हा बॉक्स 6 सेंटिमीटर लांब, 2 सेंटिमीटर रुंद आणि 3 सेंटिमीटर उंच असेल. जर सर्व काही योग्यपणे झाले, तर अंतराळातील दोन उपग्रह 10 मीटरच्या केबलने जोडण्यात येतील. हे दोन्ही उपग्रह एकमेकांच्या व्यवस्थित संपर्कात असतील, याची काळजी घेतली जाईल. हा जगातील पहिलाच प्रयोग असेल, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी दिली. एलिवेटर बॉक्स व्यवस्थिपणे मार्गक्रमण करत आहे की नाही, हे पाहण्यासाठी दोन्ही उपग्रहांमध्ये कॅमेरे लावले जातील. अंतराळात एलिवेटरचा वापर करण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल असेल. अंतराळात लिफ्ट वापरली जाऊ शकते, ही कल्पना सर्वप्रथम रशियन शास्त्रज्ञ कॉन्स्टानटिन तॉसिलकोवास्की यांना 1895 मध्ये सुचली. पॅरिसमधील आयफेल टॉवर पाहून त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली. यानंतर जवळपास एका शतकानंतर ऑर्थर सी. क्लार्क यांनी त्यांच्या एका पुस्तकात याबद्दलचे विचार मांडले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे या दृष्टीने कोणतीही प्रगती झाली नाही.
जपान अंतराळात एलिवेटर वापरण्याच्या प्रयत्नात; पुढील आठवड्यात होणार प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 10:27 AM